Navi Mumbai : वाशीच्या गार्डनमध्ये आक्रित घडलं, लेकाची शोधाशोध, अखेर पाण्याच्या टाकीत मृतदेह तरंगताना दिसला
Navi Mumbai : वाशीच्या गार्डनमध्ये खेळता खेळता पाण्याच्या टाकीत पडून सहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. मुलगा अचानक दिसेनासा झाला म्हणून त्याचे पप्पा त्याला शोधत होते, यानंतर अर्ध्या तासाने प्रकार उघड झाला.
नवी मुंबई : गार्डनमधील पाण्याच्या टाकीत पडून सहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना वाशीत घडली आहे. खेळता खेळता अचानक मुलगा गायब झाला म्हणून त्याची शोधाशोध सुरू झाली. अर्ध्या तासाने त्याचा मृतदेह पाण्याच्या टाकीत सापडला. वाशी सेक्टर 14 येथील गोरक्षनाथ पालवे उद्यानात शनिवारी (2 नोव्हेंबर) हा प्रकार घडला. या दरम्यान गार्डनमध्ये सुरक्षारक्षक नसल्याचा प्रकार उघडकीस आला. ऐन दिवाळीत घडलेल्या या दुर्घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
नेमकं घडलं काय?
शनिवारी सुट्टी असल्याने संध्याकाळी दत्तगुरुनगर येथे राहणारे विशाल उघडे (39) हे त्यांचा मुलगा सिद्धार्थ (6) याला घेऊन गार्डनमध्ये गेले होते. तिथे सिद्धार्थ हा उद्यानात खेळत असतानाच अचानक दिसेनासा झाला. त्याच्या वडिलांनी उद्यानात सर्वत्र शोध घेऊनही तो सापडला नाही. अखेर अर्ध्या तासानंतर रात्री 9 वाजता त्यांनी उद्यानातील पाण्याच्या टाकीत डोकावून पाहिलं असता त्यात मुलाचा मृतदेह सापडला. यानंतर त्याच्या वडिलांनी त्याला त्वरित जवळच्या रुग्णालयात नेलं. परंतु डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचं सांगितलं.
उद्यानातील निष्काळजीपणामुळे मुलाचा मृत्यू
मुलाच्या मृत्यूची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. चौकशीदरम्यान उद्यानाचा सुरक्षारक्षक त्या ठिकाणी हजर नसल्याचं समोर आलं. रात्री 10 पर्यंतची ड्युटी असतानाही सुरक्षारक्षक 5 वाजताच निघून गेला होता. त्यामुळे महापालिकेने उद्यानांमध्ये नेमलेले सुरक्षारक्षक कामात हलगर्जीपणा करत असल्याचं दिसून आलं. त्याशिवाय ज्या ठिकाणी पाण्याची टाकी होती, त्या ठिकाणी अंधार होता. खेळताना अंधारात सिद्धार्थला टाकीवर झाकण नसल्याने पाण्याची टाकी उघडी असल्याचं दिसलं नाही, म्हणून ही दुर्घटना घडल्याचं स्पष्ट होत आहे.
सेल्फी पॉइंटच्या इथे खेळताना शॉक लागून मुलगी गंभीर
असाच काहीसा प्रकार भाईंदरमध्ये देखील घडला आहे. खेळता खेळता पालिकेच्या सेल्फी पॉइंटच्या उघड्या विद्युत तारेला स्पर्श झाल्याने चार वर्षांच्या चिमुरडीला शॉक लागला आणि ती गंभीर जखमी झाली. याप्रकरणी नवघर पोलिसांनी केवळ विजेचं काम करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
भाईंदर पूर्वेकडील गॅस गोडाऊन गल्लीत राहणारे सलमान मुकेरी हे 30 ऑक्टोबरला रात्री सव्वा दहाच्या सुमारास चार वर्षांची मुलगी मेहशरजहां आणि मुलगा फैजान यांना घेऊन दुचाकीवरून फेरफटका मारण्यास निघाले होते. गोल्डन नेस्ट सर्कल येथील पालिका नगरसेविका निधीतून झालेल्या सेल्फी पॉइंटजवळ ते थांबले आणि पाण्याची बाटली आणण्यास गेले. यावेळी मुलगी सेल्फी पॉइंटजवळ खेळायला गेली आणि शॉक लागल्याने स्टीलच्या रेलिंगला चिकटली.
सलमान परत आले तेव्हा त्यांनी हा प्रकार समजला. त्यांनी तिला तात्काळ खेचून बाजूला केलं. जवळ जाऊन पाहिलं असता चिकटपट्टी निघून गेल्याने इलेक्ट्रिक केबल उघडी झाली होती आणि त्यावर मुलीच्या पायाचा अंगठा चिकटल्याने हा प्रकार घडला.
हेही वाचा: