कोविडमुळे पालकांचे छत्र हरविलेली मुले, पती गमावलेल्या महिलांना नवी मुंबई महापालिकेचा आर्थिक मदतीचा हात
Navi Mumbai : कोविडमुळे ज्या मुलांचे पालक मृत्यमुखी पडले आहेत किंवा ज्या महिलांच्या पतीचा मृत्यू झाला आहे त्यांच्यासाठी महापालिकेने चार महत्वाच्या आर्थिक सहाय्य योजना जाहीर केल्या आहेत.
नवी मुंबई : कोविडच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेचा तडाखा मोठ्या प्रमाणावर बसलेला असून त्यामध्ये काही नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. अनेक कुटुंबांमध्ये आई व वडील असे दोन्ही पालक अथवा त्यापैकी एका पालकाचा मृत्यू होऊन मुले अनाथ झालेली आहेत. कोविडमुळे पतीचा मृत्यू झाल्याने त्याच्या पत्नीला कौटुंबिक व आर्थिक हानीला आकस्मितरित्या सामोरे जावे लागलेले आहे. त्यामुळे त्यांचे भवितव्य अंध:कारमय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अशा अनाथ बालकांची तसेच कोव्हीडमुळे पतीचे आकस्मिक निधन झालेल्या महिलांची भावनिक व वैयक्तिक हानी भरून निघणे अशक्य आहे. अशी बालके व महिला या शिक्षण, रोजगार व आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने तसेच त्यांना सन्मानाने जगता यावे यासाठी कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्यास महानगरपालिकेने सुरवात केली आहे. महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी चार कल्याणकारी योजनांची घोषणा केली आहे.
कोविडमुळे दोन्ही पालक किंवा एक पालक गमावलेल्या मुलांच्या संगोपनाकरिता अर्थसहाय्य जाहीर केलं आहे. सदर योजनेनुसार, बालक अठरा वर्ष पूर्ण करेपर्यंत दरमहा मिळणाऱ्या अर्थसहाय्यास पात्र राहील.
दोन्ही पालक गमावलेल्या बालकास अर्थसहाय्य-
वय वर्ष 0 ते 5 - रु. 2000 प्रतिमहा
वय वर्ष 6 ते 10 - रु. 4000 प्रतिमहा
वय वर्ष 11 ते 18 - रु. 6000 प्रतिमहा
एक पालक गमावलेल्या बालकास अर्थसहाय्य-
वय वर्ष 0 ते 5 - रु. 1000 प्रतिमहा
वय वर्ष 6 ते 10 - रु. 2000 प्रतिमहा
वय वर्ष 11 ते 18 - रु. 3000 प्रतिमहा
कोविडमुळे दोन्ही पालक गमावलेल्या 18 ते 21 वयोगटातील बेरोजगार युवक, युवतींकरिता शैक्षणिक बाबी वगळून इतर बाबींच्या खर्चासाठी 50 हजार रुपये प्रतिवर्ष अर्थसहाय्य जाहीर करण्यात आलं आहे.
कोविडमुळे पतीचे निधन झालेल्या महिलेस एक रक्कमी 1.50 लाखाचे अर्थसहाय्य मिळणार आहे. सदर महिलेस स्वयंरोजगारासाठी, व्यावसाय सुरू करण्यासाठी संपूर्ण हयातीत एकदाच एक लाख रूपये देण्यात येतील.
या योजनांठी सादर करावयाची कागदपत्रे तसेच इतर अनुषांगिक माहिती नवी मुंबई महानगरपालिकेची वेबसाईट उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Maharashtra Lockdown : सोमवारपासून दुपारी चारनंतर महाराष्ट्र बंद! अनेक शहरं आणि जिल्ह्यांमध्ये निर्बंध कडक- कुठं काय सुरु, काय बंद...
- Maharashtra Corona Cases : राज्यात कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढतेय; कोल्हापूर हॉटस्पॉटच्या मार्गावर
- लोणावळा, खंडाळा घाटाचे सौंदर्य पहा विना अडथळा, डेक्कन एक्सप्रेससोबत आता विस्टाडोम कोच