virar: धक्कादायक : लग्नाचा तगादा लावत असल्याच्या कारणावरून प्रियकराकडून प्रेयसीची हत्या
पाच दिवसापूर्वी विरारच्या अर्नाळा परिसरातील म्हारंबळपाडा जेटीजवळ एका तरुणीचा मृतदेह सापडला होता.
virar: विरार : प्रेम करणे म्हणजे समोरच्या व्यक्तीचा तिच्यामध्ये असलेल्या गुणदोषांसह स्वीकार करून तिला आपले करणे. प्रेम करणे म्हणजे त्या व्यक्तीत पूर्णपणे तल्लीन होणे आणि तिच्याविषयी सकारात्मक मूल्यमापन करणे. हे मूल्यमापन बदलल्यास प्रेमभावनेतही बदल होऊ शकतात. प्रेमभावना सतत मनात ठेवायची की हद्दपार करायची, हे सर्वस्वी त्या व्यक्तीवर अवलंबून असते. सर्वसाधारणपणे प्रेमाची ही व्याख्या वाचल्यानंतर प्रेम ही किती चांगली गोष्ट वाटते. परंतु, याच प्रेमातून एखाद्याचं आयुष्य संपविण्याचा अधिकार कोणाला आहे का? तर मुळीच नाही. परंतु, अशीच एक धक्कादायक घटना विरारमध्ये घडली आहे. लग्नाचा तगादा लावत असल्याने प्रियकराने चक्क आपल्या प्रेयसीचीच हत्या केल्याची घटना समोर आली आहे.
पाच दिवसापूर्वी विरारच्या अर्नाळा परिसरातील म्हारंबळपाडा जेटीजवळ एका तरुणीचा मृतदेह सापडला होता. या हत्येचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलं आहे. विरारच्या फुलपाडा येथे राहणारी रेश्मा प्रकाश खिडिये असे हत्या झालेल्या दुर्देवी मुलीचे नाव आहे. तर हर्षद पाटील असे हत्या केलेल्या संशयीत आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत दोघांना अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, रेश्माचे संशयीत आरोपी हर्षद पाटील याच्याशी 2019 पासून प्रेमसंबध होते. त्यातून ते एकमेकांजवळ आले. रेश्मा हर्षदकडे नेहमी लग्नाचा तगादा लावू लागली. त्यातून रेश्मा आणि हर्षदचे खटके उडू लागले. दोघांमध्ये या विषयावरून कायम वाद होवू लागले. याचाच राग हर्षदच्या डोक्यात होता.
हर्षदने मित्र क्रितेश अशोक किणी याच्या बरोबर कट रचून रेश्माला 24 आणि 25 नोव्हेंबरच्या मध्यरात्री खाडी किन्नारी भेटायला बोलावलं. रेश्मा भेटायला आल्यानंतर याच ठिकाणी तिचा गळा आवळून हत्या केली. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी तिच्या मृतदेहाला दहा किलोचा दगड बांधून मृतदेह बोटीतून नेऊन खाडीत फेकून दिला आणि दोघे पसार झाले.
अर्नाळा म्हारंबल पाडा जेटी क्रमांक 22 परिसरात दगड बांधलेल्या, कुजलेल्या अवस्थेत 27 नोव्हेंबर रोजी मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाचे शवविच्छेद केल्यानंतर अर्नाळा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याच्या अनुषंगाने अर्नाळा पोलीस आणि गुन्हे कक्ष 03 अशा दोन स्वतंत्र टीमने तपास केला. सखोल तपास केल्यानंतर हे खळबळजनक सत्य समोर आलं. या हत्येप्रकरमी पोलिसांनी दोन संशयीतांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
इतर महत्वाच्या बातम्या