कोरोना रुग्णांसाठी मुंबईत अवाढव्य ऑक्सिजन टाक्यांची महापालिकेकडून व्यवस्था
मुंबईतील रुग्णालये आणि कोरोना उपचार केंद्र मिळून 20 ठिकाणी 2 लाख 8 हजार लीटर ऑक्सिजन पुरवठ्याची क्षमता निर्माण करण्याचे काम आता पूर्ण झालं आहे.

मुंबई : रुग्णालये, कोरोना आरोग्य केंद्र याठिकाणी ऑक्सिजन टाक्यांमार्फत अतिरीक्त 2 लाख 8 हजार लीटर ऑक्सिजनचा पुरवठा होणार आहे. मुंबईतील 14 रुग्णालयं आणि कोविड सेंटर्समध्ये मिळून 13 हजार किलोलीटर, हजार किलोलीटर अशा अवाढव्य ऑक्सिजनच्या टाक्या तर इतर सहा रुग्णालयांमध्ये एक हजार लीटर क्षमतेच्या टाक्या बसवणार आहे.
कोविड 19 बाधित रुग्णांसाठी निरनिराळ्या रुग्णालये व कोरोना उपचार केंद्रांमध्ये रुग्णखाटांची संख्या वाढवत असतांना तितक्याच क्षमतेनं ऑक्सिजन पुरवठा होणंही गरजेचं आहे. मुंबईतील रुग्णालये आणि कोरोना उपचार केंद्र मिळून 20 ठिकाणी 2 लाख 8 हजार लीटर ऑक्सिजन पुरवठ्याची क्षमता निर्माण करण्याचे काम आता पूर्ण झालं आहे.
अंतीम चाचण्यांनंतर ही अतिरीक्त ऑक्सिजन पुरवठ्याची ही व्यवस्था सुरू होणार आहे. सध्या मुंबईत इतर आजारांच्या रुग्णांना आवश्यक असलेला ऑक्सिजन पुरवठा कायम ठेवून कोरोना बाधित रुग्णांना सातत्याने ऑक्सिजन पुरवठा करणं गरजेचं आहे. स्वाभाविकच एरवीपेक्षा ऑक्सिजन पुरवठ्याची अधिक गरज आहे. याबाबत महानगरपालिका प्रशासनाने नियोजन करुन आणि मोठी रुग्णालये आणि कोरोना उपचार केंद्र (जम्बो फॅसिलिटी) मिळून सध्या 14 ठिकाणी ऑक्सिजन पुरवठा करण्याची कार्यवाही युद्धपातळीवर केली आहे. ही यंत्रणा कार्यान्वित करण्याचे काम आता टप्प्या टप्प्यानं करण्यात येत आहे. इतर सहा रुग्णालयांमध्ये देखील गरजेनुसार याप्रकारची यंत्रणा उभारण्यात आली आहे.
ऑक्सिजन पुरवठा होणारी विविध 8 कोरोना उपचार केंद्र
वरळी एनएससीआय डोम 13 हजार लीटर (1), महालक्ष्मी रेसकोर्स 13 हजार लीटर (1), दहिसर टोल नाका 13 हजार लीटर (1), दहिसर बस आगार 13 हजार लीटर (1), मुलूंड येथील रिचर्डसन क्रूडास 13 हजार लीटर (2), गोरेगाव नेस्को 13 हजार लीटर (2), वांद्रे –कुर्ला संकुल (भाग 1) 13 हजार लीटर (1), वांद्रे-कुर्ला संकुल (भाग 2) १३ हजार लीटर (1)
ऑक्सिजन पुरवठा होणारी सहा रुग्णालये
शीव (सायन) येथील महानगरपालिका रुग्णालय 6 हजार लीटर (1), कस्तुरबा रुग्णालय 6 हजार लीटर (1), नायर रुग्णालय 13 हजार लीटर (1) आणि 6 हजार लीटर (1), केईएम रुग्णालय 13 हजार लीटर (1), घाटकोपरचे राजावाडी रुग्णालय 6 हजार लीटर (1), कांदिवली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महानगरपालिका रुग्णालय 6 हजार लीटर (1).
ऑक्सिजन पुरवठा होणारी इतर सहा रुग्णालय
भगवती रुग्णालय 1 हजार लीटर (2), कुष्ठरोग उपचार रुग्णालय 1 हजार लीटर (1), धारावी नागरी आरोग्य केंद्र 1 हजार लीटर (2), गोवंडी येथील शताब्दी रुग्णालय 1 हजार लीटर (1), कुर्ला भाभा रुग्णालय 1 हजार लीटर (2), कामाठीपुरा नेत्र रुग्णालय 1 हजार लीटर (1)
याव्यतिरिक्त जोगेश्वरी ट्रॉमा रुग्णालय, बोरिवलीचे भगवती रुग्णालय, गोवंडीचे शताब्दी रुग्णालय, वांद्रे येथील भाभा रुग्णालय, गोरेगाव स्थित नेस्को कोरोना उपचार केंद्र आदी ठिकाणी मिळून 100 ड्युरा ऑक्सिजन सिलेंडर्सदेखील पुरवण्यात येत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
