Mumbai Water Crisis : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये फक्त 48 दिवसांचा पाणी साठा; जूनअखेरीस पाणी कपातीचा निर्णय घेण्याची शक्यता
एकीकडे बिपारजॉय चक्रीवादळामुळे (Biporjoy Crisis) मान्सून पुढे सरकण्यास खंड पडलाय. दुसरीकडे, अल निनो देखील सक्रिय झाल्याने दुष्काळात तेरावा महिना अशी स्थिती निर्माण झाली आहे.
मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातील पाणीसाठ्यात कमालीची घट झाली आहे. सातही धरणांमधील राखीव साठा मिळून 48 दिवस पुरेल इतकेच पाणी शिल्लक आहे. जून महिना ओसरला तरी अद्याप पावसाचा पत्ता नाही. अशात, मुंबईकरांसमोर पाणीकपातीचं संकट उभं ठाकलं आहे. (Mumbai Water Crisis News)
48 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा
एकीकडे बिपारजॉय चक्रीवादळामुळे (Biporjoy Crisis) मान्सून पुढे सरकण्यास खंड पडलाय. दुसरीकडे, अल निनो देखील सक्रिय झाल्याने दुष्काळात तेरावा महिना अशी स्थिती निर्माण झाली आहे. मान्सूनवर निर्भर असलेल्या बळीराजासोबतच धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने आटत असल्याने सर्वसामान्य नागरिक देखील चिंताग्रस्त झाला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील राखीव पाणीसाठा मिळून 48 दिवस पुरेल इतकाच असल्याची माहिती आहे.
जून अखेरीस पाणी कपातीचा निर्णय घेण्याचा विचार
जून महिना निम्मा ओसरला तरी मान्सून मुंबईत दाखल झालेला नाही. त्यामुळे आणखी 15 दिवस वाट पाहून जून अखेरीस पाणी कपातीचा निर्णय घेण्याचा मुंबई महानगरपालिका प्रशासनाचा विचार आहे. त्यामुळे 15 दिवसांमध्ये पाऊस पडला नाही. तर मुंबईकरांना जुलै महिन्यात पाणी कपातीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
मुंबईतील सातही तलावांमध्ये किती पाणीसाठा?
- अप्पर वैतरणा - शून्य टक्के
- मोडकसागर - 22.17 टक्के
- तानसा - 19.58 टक्के
- मध्य वैतरणा - 13.32 टक्के
- भातसा -5.27 टक्के
- विहार - 21.92 टक्के
- तुळसी - 28 टक्के
मुंबईकरांसमोरचं पाणी संकट (Mumbai Water Crisis)
2023 मध्ये एकूण सातही धरणांमध्ये 15.69 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. पालिकेकडून राज्य सरकारला ह्या धरणांमधील काही साठा राखीव ठेवावा अशी मागणी केल्यानंतर ती मान्य करण्यात आली आहे. सोबतच, जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून राज्यात चांगल्या पावसाची अपेक्षा आहे. त्यामुळे मुंबईकरांसमोरचं पाणी संकट टळेल अशी अपेक्षा आहे. मात्र तोपर्यंत तरी मुंबईकरांना पाणीजपून वापरावं लागणार आहे.
राज्यातील पाणीसाठ्यातही घट (Mumbai News)
दुसरीकडे राज्यातील पाणीसाठ्यातही मोठी घट झाली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत धरणांमधील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात सारखीच परिस्थिती आहे. मान्सून उशिरा दाखल होणार असल्याने चिंतेत आणखीच भर पडली आहे. एकीकडे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तर दुसरीकडे शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न देखील निर्माण होऊ शकतो.
हे ही वाचा :
Kolhapur Water Crisis: कोल्हापुरात उद्यापासून दिवसाआड पाणीपुरवठा; पावसाने पूर्णत: दडी मारल्याने काटकसर सुरु