(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबईकरांचं वीज, पाणी महागलं; पाणीपट्टीत 7.12 टक्क्यांची दरवाढ, तर दोन वीजबिलांची रक्कम आगाऊ भरण्याचं बेस्टचं फर्मान
Mumbai News : वीज आणि पाण्यासाठी मुंबईकरांचा खिसा जास्त रिकामा होणार, पाणीपट्टीत 7.12 टक्क्यांची दरवाढ मंजूर, तर अनामत म्हणून दोन बिलाची रक्कम आगाऊ भरण्याचं बेस्टचं फर्मान.
Mumbai News : मुंबईकरांच्या खिशाला कात्री लागणार आहे. वीज आणि पाण्यासाठी मुंबईकरांचा खिसा आता जास्त रिकामा होणार आहे. मुंबईकरांच्या वीजबिलात (Electricity) आणि पाणी बिलात (Water Bill) वाढ होणार आहे. कोरोना काळात (Coronavirus) दोन वर्षांपासून थांबलेल्या पाणीपट्टीमध्ये (Water Bill) आता वाढ होणार आहे. 2022 आणि 2023 साठी 7.12 टक्के पाणीपट्टी वाढ करण्यास पालिका आयुक्त प्रशासक इक्बाल चहल यांनी मंजुरी दिली आहे. जूनपासून ही दरवाढ लागू केली जाणार आहे. तर दुसरीकडे सुरक्षा अनामतीच्या नावाखाली दोन महिन्यांच्या बिलांची रक्कम आगाऊ स्वरूपात भरावीत, असं फर्मान 'बेस्ट' प्रशासनानं काढल्यानं लाखो सर्वसामान्य वीज ग्राहकांचं 'बजेट' कोलमडणार आहे. दरम्यान हा निर्णय रद्द करण्याची मागणी वीज ग्राहकांकडून केली जात आहे.
मुंबईकरांचे पाणी महागलं
मुंबईला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी अशा सात तलावांतून दररोज 3850 दशलक्ष लिटर शुद्ध पाणीपुरवठा केला जातो. हा पाणीपुरवठा करण्यासाठी पालिकेला वर्षभरात कोट्यवधींचा खर्च करावा लागतो. त्यामुळे पाणीपुरवठ्याला लाभ मिळणाऱ्या प्रकाराप्रमाणे पालिकेकडून प्रत्येकी एक हजार लिटरमागे पाणीपट्टी आकारली जाते. महापालिकेने 2012 मध्ये घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी किमान 8 टक्के पाणीपट्टी वाढवता येते, मात्र मार्च 2020 पासूनच्या कोरोना प्रभावामुळे पाणीपट्टी वाढवण्यात आली नव्हती. मात्र या वर्षी पाणीपट्टी वाढ करण्यास प्रशासनाने मंजुरी दिली आहे. दरम्यान, पालिकेला दरवाढीमुळे 91.46 कोटींचा महसूल मिळण्याचा अंदाज आहे.
'बेस्ट'चा ग्राहकांना शॉक, सुरक्षा अनामतीसाठी आगाऊ दोन बिलं भरण्याचं पत्रक
'बेस्ट'च्या वीज विभागाकडून मुंबई शहरातील सुमारे दहा लाख 80 हजार ग्राहकांना वीज पुरवठा केला जातो. यामध्ये आठ लाख 50 हजार तर दोन लाख दहा हजार व्यावसायिक ग्राहक आहेत. या ग्राहकांना प्रत्येक महिन्याचे बिल संबंधित विभागाकडून ग्राहकांना पाठवण्यात येते. हे बिल ऑनलाइन भरण्याची सुविधाही 'बेस्ट'कडून करण्यात आली आहे. मात्र यावेळी 'बेस्ट'कडून ग्राहकांना पाठवण्यात आलेल्या बिलासोबत सुरक्षित बिल भरण्याबाबतचे पत्रक पाठवले आहे. ही सुरक्षा अनामत रक्कम 26 डिसेंबरपर्यंत भरावी लागणार आहे. मात्र याचा लाखो गोरगरीब ग्राहकांना नाहक आर्थिक भुर्दंड बसणार असल्याने हे परिपत्रक मागे घ्यावी, अशी मागणी पालिकेतील माजी विरोधी पक्षनेते काँग्रेसचे रवी राजा यांनी आज पालिका मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन केली आहे. याबाबत त्यांनी पालिका प्रशासनासह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
बीएमसी प्रभाग संख्या, पुर्नरचनेवरील काम तूर्तास 'जैसे थे'; सुनावणी 5 जानेवारीपर्यंत तहकूब