Mumbai University : मुंबई विद्यापीठाची बनावट गुणपत्रिका दहा ते बारा हजार रुपयांत? प्रशासनाचा कारवाई करण्याचा इशारा
Mumbai University Fake Mark Sheet : बनावट गुणपत्रिका देणाऱ्यापासून सावध रहावे असं आवाहन विद्यापीठाने केलं आहे. पदवी देणाऱ्यावर आणि घेणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.
मुंबई : दहा ते बारा हजार रुपयांत मुंबई विद्यापीठाची बनावट गुणपत्रिका (Mumbai University Fake Mark Sheet) मिळत असल्याचं विद्यापीठ प्रशासनाच्या लक्षात आलं आहे. या प्रकरणी मुंबई विद्यापीठ पोलिसात तक्रार दाखल करणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. या प्रकरणात आता किती जणांची बनावट गुणपत्रिका देऊन फसवणूक करण्यात आली आहे हे तपासण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे.
मुंबई विद्यापीठाची गुणपत्रिका 10 ते 12 हजारात घरी बसून मिळेल अशी जाहिरात काही दिवसापूर्वी फेसबुक या समाज माध्यमावर आली होती. त्यानंतर पुणे येथील एका व्यक्तीने ती जाहिरात पाहून, त्याने काही रक्कम दिल्यानंतर त्या व्यक्तीच्या व्हॉटसॲपवर एक बनावट गुणपत्रिका मिळाली अशाप्रकारची माहिती विद्यापीठास प्राप्त झाली आहे.
विद्यार्थ्यांनी सावध राहण्याचं विद्यापीठाचं आवाहन
संबंधित प्रकरणाची मुंबई विद्यापीठाने गंभीर दखल घेतली आहे. यावर मुंबई विद्यापीठ पोलीस स्थानकांमध्ये याची सायबर तक्रार नोंदविणार आहे. विद्यार्थ्यांनी अशा बनावट गुणपत्रिका आणि पदवी देणाऱ्यापासून सावध रहावे असे आवाहन मुंबई विद्यापीठाने केले आहे.
पुण्यातील व्यक्तीची फसवणूक
पुणे येथील एका व्यक्तींने फेसबुक या समाज माध्यमावर मुंबई विद्यापीठाची पदवी घरी बसून एका दिवसात 10 ते 12 हजारात मिळेल अशी जाहिरात पाहिली. त्याने त्या जाहिरातीतील फोनवर एका व्यक्तीशी संपर्क केला असता त्याने 2000 रुपये ऍडव्हान्स मागितले
अॅडव्हान्स रक्कम भरल्यानंतर त्याच्या व्हॉटसॲपवर मुंबई विद्यापीठाची बीएससीची एक कथित बनावट गुणपत्रिका प्राप्त झाली अशी माहिती मुंबई विद्यापीठास प्राप्त झाली. याची गंभीर दखल मुंबई विद्यापीठाने घेतली व पोलिसात तक्रार दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. यानुसार पोलिसात तक्रार दाखल करण्यात येणार आहे.
अशा प्रकारच्या कोणत्याही फसव्या जाहिरातीला विद्यार्थ्यांनी बळी पडू नये, ही पदवी किंवा गुणपत्रिका बनावट आहे. फोटोशॉप किंवा इतर साधनाचा वापर करून बनावट गुणपत्रिका किंवा पदवी बनविली आहे अशी माहिती विद्यापीठाने दिली.
या सोबत ज्या व्यक्तींनी गुणपत्रिका घेतली आहे, तीच बनावट आहे. एप्रिल 2023 ची बीएससी सत्र 6 ची ही कथित गुणपत्रिका असून त्यावर स्वाक्षरी मात्र यापूर्वीच्या जुन्या परीक्षा संचालकांची आहे. यामुळेच अशा बनावट गुणपत्रिका व पदवी देणाऱ्यापासून सावध रहावे असं आवाहन विद्यापीठाने केलं आहे. तसेच पदवी देणाऱ्यांवर आणि पदवी घेणाऱ्यांवर मुंबई विद्यापीठाकडून कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.
ही बातमी वाचा :