(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aarey BKC Metro 3: भुयारी मेट्रोचा आरे-बीकेसी पहिला टप्पा सुरु होणार, नवरात्रात मोदींच्या हस्ते उद्घाटन, 50 रुपये तिकीट
Aarey to BKC underground metro line: मुंबईकरांसाठी लवकरच आरे ते बीकेसी हा मेट्रो मार्ग खुला होणार आहे. पंतप्रधान मोदी नवरात्रात उद्घाटन करणार. नव्या मेट्रोचे तिकीट किती?
मुंबई: गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या आणि मुंबईकरांचे डोळे लागून राहिलेल्या कुलाबा-वांद्रे मेट्रो-3 भुयारी मार्गावरील आरे ते बीकेसी (Aarey BKC Metro) हा पहिला टप्पा लवकरच कार्यान्वित आहे. नवरात्रौत्सवाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या हस्ते या पहिल्या टप्प्यातील मार्गाचे उद्घाटन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून भुयारी मेट्रो-3 हा मार्ग मुंबईकरांसाठी खुला होणार आहे. त्यादृष्टीने मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. भुयारी मेट्रोने (Mumbai Metro 3) प्रवास करण्यासाठी मुंबईकरांना 10 रुपये ते 50 रुपये मोजावे लागतील, अशी प्राथमिक माहिती आहे.
मेट्रो-3 च्या भुयारी मार्गामुळे आरे ते बीकेसी हे अंतर अवघ्या 22 मिनिटांत पार करता येणार आहे. सध्या आरे ते बीकेसी या प्रवासासाठी साधारण 45 ते 60 मिनिटांचा वेळ लागतो. सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी प्रवासाचा हा कालावधी आणखी वाढतो. मात्र, भुयारी मेट्रोमुळे या प्रवासाचा वेळ कमी होईल. त्यामुळे मुंबईकरांना वेळेत ये-जा करता येईल. याशिवाय, मेट्रोचा गारेगार प्रवास हा सुखदायक अनुभव असेल. तर मेट्रो-3 चा आरे ते कफ परेड हा संपूर्ण मार्ग कार्यान्वित झाल्यास या संपूर्ण प्रवासाचे तिकीट शुल्क साधारण 70 रुपये इतके असेल. एप्रिल 2025 पर्यंत उर्वरित टप्पा कार्यान्वित होईल, असा अंदाज आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 4 ऑक्टोबरला मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. 3 तारखेला घटस्थापना होणार असून नवरात्रौत्सव सुरु होईल. येत्या काही दिवसांमध्ये राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होऊ शकते. त्यापूर्वीच पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते मुंबईतील पभुयारी मेट्रोच्या या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन होईल, असे सांगितले जात आहे.
भुयारी मेट्रोचे वेळापत्रक कसे असेल?
आरे-बीकेसी या भुयारी मेट्रोच्या पहिल्या टप्प्यात दर 6.4 मिनिटांनी गाडी सोडली जाईल. या मार्गावर एकूण 9 मेट्रो ट्रेन असतील. त्या माध्यमातून प्रत्येक दिवशी 96 फेऱ्या चालवल्या जातील. भविष्यात या मेट्रो मार्गावरुन प्रत्येक दिवशी 13 लाख मुंबईकर प्रवासी करतील. यामुळे लोकल रेल्वे सेवेवरचा ताण कमी होईल. लोकल ट्रेनचे 15 टक्के प्रवासी नव्या मेट्रो सेवेकडे वळतील. याशिवाय, रस्त्यावरील वाहनांची संख्याही कमी होईल, असे मत एमएमआरसीच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी व्यक्त केले.
आरे ते बीकेसी मेट्रो मार्गावरील स्टेशन्स
- आरे
- सिप्झ
- एमआयडीसी
- मरोळ नाका
- CSMIA T2 (एअरपोर्ट)
- सहार रोड
- CSMIA डोमेस्टिक एअरपोर्ट
- सांताक्रूझ
- विद्यानगरी
- बीकेसी
आणखी वाचा