Mantralaya Bomb Threat : मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध, धमकी देण्यामागचं कारणही आले समोर
Mantralaya Bomb Threat : मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध लागला आहे. नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील मकडधोकडा या गावाचा तो रहिवासी आहे.
मुंबई : मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा धमकी फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध लावण्यात पोलिसांनी यश आले आहे. मुंबई येथील मंत्रालयात आज दुपारी बॉम्ब सदृश्य वस्तू ठेवल्याचा धमकीवजा कॉल करणारा व्यक्तीचे नाव सागर मांढरे आहे. नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील मकडधोकडा या गावाचा तो रहिवासी आहे. धमकीचा फोन आल्यानंतर मंत्रालयातील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे सागर मांढरे गेले अनेक दिवस वेस्टर्न कोल फिल्ड्सच्या खाणी लगतच्या जमिनीचा सातबारा तहसीलदार, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त या सर्व पातळ्यांवर मागत आहे. मात्र, प्रशासकीय अधिकाऱ्याप्रमाणे ती जमीन अस्तित्वातच नसल्यामुळे त्याचा सातबारा त्याच्या नावावर देता येत नाही. याच प्रकरणी सागर मांढरेने मंत्रालयात ही तक्रार केली आहे आणि त्याच तक्रारीसंदर्भात तो यापूर्वी मंत्रालयातही जाऊन आला आहे. मात्र, त्याच्या मागणीनुसार त्या जमिनीचा सातबारा त्याच्या नावावर होत नसल्यामुळे तो अशाच पद्धतीने विविध कार्यालयांमध्ये फोन करत राहतो. यापूर्वीही त्याने काही सरकारी कार्यालयांमध्ये असे धमकीचे फोन केल्याची पोलिसांची माहिती आहे.
धमकीचा फोन आल्याने खळबळ
धमकीचा फोन आल्यानंतर मंत्रालयात सर्च ऑपरेशन सुरु झालं. सुदैवानं आज रविवार म्हणजेच, सुट्टीचा दिवस असल्यामुळे मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सुट्टी आहे. त्यामुळे जास्त गोंधळ झाला नाही. पोलिसांच्या आणि बॉम्बशोधक पथकाच्या गाड्याही मंत्रालयासमोर मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत होत्या. तसेच बॉम्बशोधक पथकासोबतच श्वान पथकंही मंत्रालयात दाखल झाली होती. कोणती संशयित वस्तू मिळतेय का? याचा कसून तपास केला जात होता.