मुंबईत स्पेशल 26! तोतया अधिकारी बनून व्यावसायिकाच्या घरी रेड; मात्र पोलिस शेरास सव्वाशेर...
आयकर विभागाचे अधिकारी असल्याचं सांगून पाच जणांच्या टोळीने मुंबईतल्या विक्रोळीमध्ये राहणाऱ्या एका व्यावसायिकाच्या घरावर छापा टाकला आणि या बनावट कारवाईत रोख जप्त केली.
Mumbai IT Fake Raid: अक्षय कुमारचा (Akshay Kumar) स्पेशल 26 हा सिनेमा आठवतोय का? ज्यात अक्षय कुमार आणि त्याचे सहकारी तोतया अधिकारी बनून अनेकांना हातोहात गंडवतात. असाच प्रकार मुंबईत सुरु आहे. आयकर विभागाचे अधिकारी असल्याचं सांगून पाच जणांच्या टोळीने मुंबईतल्या विक्रोळीमध्ये राहणाऱ्या एका व्यावसायिकाच्या घरावर छापा टाकला आणि या बनावट कारवाईत रोख जप्त केली. मात्र शेरास सव्वाशेर भेटतोच. पोलिसांनी देखील वेगाने तपासाची चक्र फिरवत तोतया आयकर अधिकाऱ्यांच्या टोळीच्या मुसक्या आवळल्यात. आरोपींमध्ये मनोविकार तज्ज्ञ प्रशांत भटनागर, वाहतूक व्यावसायिक वसीम कुरेशी, चालक धीरज कांबळे आणि इजाज अशा चार जणांना अटक केली आहे. या आरोपींनी तोतया अधिकारी बनून 26 जुलै रोजी विक्रोळीतल्या व्यावसायिकाला सावज केलं होतं.
राज्यात सध्या आयटीच्या रेडची साखळीच सुरु
राज्यात सध्या आयटीच्या रेडची साखळीच सुरु आहे. जालना, औरंगाबादनंतर सोलापूर, पंढरपूर, कोल्हापूरसह वेगवेगळ्या ठिकाणी या धाडी पडत आहेत. अशात मुंबईत घडलेल्या या फेक धाडीमुळं सर्वत्र चर्चा आहे. अशा बनावट आयटी अधिकाऱ्यांपासून सुरक्षित राहा, असं आवाहन केलं जात आहे. मुंबईत बनावट आयटी अधिकारी असल्याचे भासवून छापे टाकण्यास सुरुवात झालीय असं या घटनेतून दिसतंय.
व्यावसायिकाच्या घरी बोगस आयटीची रेड
पोलिसांच्या माहितीनुसार, विक्रोळी येथील एका व्यावसायिकाच्या घरी आयटीची रेड पडली. इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांच्या वेशात पाच जणांच्या टोळीने ही रेड टाकून काही रोकड जप्तीची कारवाई केली. पण ही कारवाई म्हणजे निव्वळ लुटमार झाल्याचे स्पष्ट होताच हे प्रकरण पार्क साईट पोलिसांकडे गेले. पोलिसांनी देखील कौशल्याने गुन्ह्याची उकल करत चौघांच्या अटक केली आहे. या प्रकरणात मुख्य आरोपीसह अन्य तिघांचा शोध सुरू आहे.
भरदुपारी पाच जणांचे पथक घरी धडकले
विक्रोळी पश्चिमेकडील एका अलिशान टॉवरमध्ये व्यावसायिक राहतात. 26 जुलैच्या भरदुपारी पाच जणांचे पथक त्यांच्या अलिशान घरावर धडकले. इन्कम टॅक्स अधिकारी असल्याची ओळख सांगत त्या पथकाने संपूर्ण घराची झडती घेतली. पण त्यांच्या हाती केवळ एक लाखाची रोकड लागली. ते पैसे घेऊन पथक निघून गेले, पण थोडावेळाने बोगस आयटी अधिकाऱ्यांनी लुटमार केल्याचे त्यांनी पार्क साईट पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस पथकाने शिताफिने तपास करत चालक असलेला धीरज कांबळे, मनोविकार तज्ज्ञ प्रशांत भटनागर, ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करणारा वसीम कुरेशी आणि एजाज अशा चौघांना पकडले. तर या गुन्ह्याचा मास्टर माईंड नितीन कोठारी तसेच नीता कांबळे, मरीयम अप्पा आणि शमीम खान या चौघांचा शोध पोलिस घेत आहेत.