बँकांचा बनावट मेल आयडी बनवून फसवणूक; मुंबईत दोघांना बेड्या
एका खातेदाराच्या खात्यातून 9 लाख रूपयांची रक्कम काढल्यानंतर संबंधित खातेदाराने याबाबत तक्रार दाखल केली. त्यामुळे कांदिवली पूर्व समता नगर सायबर सेलच्या पथकाने तपास करून दोन आरोपींना अटक केली.
मुंबई : बँकांचा बनावट मेल आयडी बनवून फसवणूक करणाऱ्या दोघांना मुंबईच्या समता नगर सायबर सेल पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे. विवेक सुनील सभरवाल (वय, 38) आणि बिरेनभाई शांतीलाल पटेल (वय, 33) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
एका खातेदाराच्या खात्यातून 9 लाख रूपयांची रक्कम काढल्यानंतर संबंधित खातेदाराने याबाबत तक्रार दाखल केली. त्यामुळे कांदिवली पूर्व समता नगर सायबर सेलच्या पथकाने तपास करून या दोन आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून 69 हजारांची रोकड, 9 मोबाईल आणि सरकारी कागदपत्रे जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक सविता कदम यांनी दिली.
"मालाड कोऑपरेटिव्ह बँकेचे युनियन बँकेत विलीनीकरण केले जात असल्याची माहिती आरोपींना मिळताच त्यांनी संबंधित खातेदाराला फोन करून केवायसी अपडेट करण्यास सांगितले. त्यानंतर बँकेच्या नावे खोटा ईमेल आयडी बनवून त्याची संपूर्ण कागदपत्रे मागवली. या कागदपत्रांवर संबंधित खातेदाराची स्वाक्षरीही होती. खातेदाराची कागदपत्रे घेतल्यानंतर आरोपींनी खातेदाराच्या मोबाईल क्रमांकाच्या जागी त्यांचा मोबाईल क्रमांक अपडेट करून बँकेत कागदपत्रांसह मोबाईल क्रमांक बदलण्यासाठी मेल केला व इंटरनेट बँकिंगद्वारे तक्रारदाराच्या खात्यातून स्वत:च्या खात्यात 9 लाख रुपये ट्रान्सफर केले, अशी माहिती कांदिवली पूर्व समता नगर सायबर सेलच्या पथकाने दिली.
अशी करायचे फसवणूक!
"विलीन झालेल्या नवीन बँकांच्या नावाने बनावट ईमेल आयडी तयार करून खातेदारांना केवायसी अपडेटसाठी दोन्ही संशयीत आरोपी फोन करायचे. त्यानंतर बनावट ईमेलवर बँकेच्या नावाने मेल आयडी तयार करून खातेदारांची संपूर्ण कागदपत्रे मिळवायचे. खातेदारांची कागदपत्रे आणि स्वाक्षरीच्या आधारे हे आरोपी बँकेला ईमेल करून त्यांचा मोबाईल क्रमांक अपडेट करायचे. त्यानंतर ऑनलाइन बँकिंग सुरू करून त्यांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करायचे अशी माहिती कांदिवली पूर्व समता नगर सायबर सेलच्या पथकाने दिली आहे.
महत्वाच्या बातम्या