Mumbai Saga Release | 'मुंबई सागा' सिनेमाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा, चित्रपटाविरोधातील याचिका हायकोर्टानं फेटाळली
'मुंबई सागा' सिनेमाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला असून प्रदर्शनाच्या आदल्या दिवशी चित्रपटाच्या प्रदर्शनावर रोख लावण्यास हायकोर्टानं नकार दिला आहे. मुंबई अंडरवर्ल्डवर आधारीत सिनेमात वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी जाहीर करण्याला याचिकाकर्त्यांचा विरोध होता. अशातच गँगस्टर डी.के.राव, अश्विन नाईक आणि अमर नाईक कुटुंबिय यांना ऐनवेळी दिलासा देण्यास हायकोर्टानं नकार दिला आहे.
मुंबई : मुंबईतील गुन्हेगारी विश्वावर आधारित असलेल्या 'मुंबई सागा' या चित्रपटाविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. त्यामुळे शुक्रवारी या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे.
रवी मल्लेश बोहरा ऊर्फ गँगस्टर डी. के. राव याच्यासह अमर नाईकच्या कुटुबियांनी यासंदर्भात हायकोर्टात याचिका केली होती. सदर चित्रपटाची माहिती आम्हाला माध्यमांतून मिळाली. यामध्ये बोहरा, अमर नाईक आणि अश्विन नाईक यांच्या वैयक्तिक जीवनासंबधित काही घटना दाखविण्यात आल्या आहेत. त्याचा आमच्या खासगी आयुष्यावर परिणाम होणार असून आमच्या मुलभूत अधिकारांचा भंग होत असल्याचा दावा या याचिकेतून करण्यात आला होता. यासंदर्भात याचिकाकर्त्यांनी सीबीएफसीसह चित्रपटीचे निर्माते आणि दिग्दर्शकांना नोटीसही बजावली होती.
या याचिकेवर गुरुवारी न्यायमूर्ती अमजद सय्यद आणि न्यायमूर्ती नितीन जामदार यांच्या खंडपीठापुढे सुनावणी पार पडली. तेव्हा, नाईक आणि बोहरा यांच्यावर दाखल करण्यात आलेले काही खटले अद्यापही प्रलंबित आहेत. सदर चित्रपटामुळे या खटल्यांवरही परिणाम होईल, असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांच्यावतीने करण्यात आला. मात्र, चित्रपट प्रदर्शानच्या एक दिवस आधी आम्ही चित्रपट प्रदर्शन रोखू शकतनाही असा दावा निर्मात्यांनी केला. त्याची दखल घेत चित्रपट प्रदर्शित होण्याच्या ऐनवेळी याचिका दाखल करण्यात आल्यामुळे आम्ही दिलासा देऊ शकत नाही, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने याचिकाकर्त्यांना कोणताही दिलासा दण्यास नकार दिला आणि याचिका फेटाळून लावली.
'मुंबई सागा' चे लेखन आणि दिग्दर्शन संजय गुप्ता यांनी केलं आहे. भूषण कुमार यांनी सिनेमाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात जॉन अब्राहम आणि इम्रान हाश्मीसह सुनील शेट्टी, महेश मांजरेकर आणि काजल अग्रवाल यांच्या मुख्य भूमिका आहेत. न्यायालयाच्या निर्णयामुळे हा सिनेमा शुक्रवार 19 मार्च रोजी देशभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- TRP Scam | अर्णब गोस्वामींना आरोपी दाखवलं नसलं तरी तपास करण्याचा आम्हाला पूर्ण अधिकार, राज्य सरकारची हायकोर्टात भूमिका
- टीआरपी घोटाळाप्रकरणी मुंबई पोलिसांच्या तपासातील भूमिकेवर हायकोर्टाची तीव्र नाराजी