Mumbai Accident: मुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्गावर बीएमडब्ल्यू अन् पोर्शे कारची शर्यत, कार पलटी होऊन भीषण अपघात, चालक गंभीर जखमी
Mumbai Western Express Way Accident: मुंबईतील पश्चिम उपनगरातील जोगेश्वरी मेट्रो स्थानकाजवळ गुरुवारी पहाटे भीषण अपघात झाला. बीएमडब्ल्यू आणि पोर्शे कारची रेस.

Mumbai Western Express Way Accident: मुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्गावर गुरुवारी पहाटे एका कारचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये या कारचा चालक गंभीररित्या जखमी झाला आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावर (Western express highway) पहाटे अडीचच्या सुमारास बीएमडब्ल्यू आणि पोर्शे कारची शर्यत लागली होती. बोरिवलीहून अंधेरीला येणाऱ्या मार्गावर या दोन्ही गाड्यांची शर्यत (Car Racing) सुरु होती. त्यावेळी पोर्शे कारच्या (Prosche Car) चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट दुभाजकावर जाऊन आदळली. त्यानंतर ही पोर्शे कार चार-पाच वेळा पलटी झाली. यामध्ये पोर्शे कारचा चालक गंभीररित्या जखमी झाला आहे. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर बीएमडब्ल्यू कारच्या (BMW Car) चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Prosche and BMW Car racing Accident)
या अपघातामध्ये पोर्शे कारचा अक्षरश: चेंदामेंदा झाला आहे. पोर्शे कार दुभाजकावर धडकल्यानंतर गाडीतील एअरबॅग्ज उघडल्या गेल्या. त्यामुळे चालकाचा जीव वाचला असला तरी त्याला गंभीर दुखापत झाली आहे. मात्र, कारच्या एका भागाचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला आहे. या अपघातावेळी रस्त्यावर असलेल्या लोकांनी पोर्शे कारच्या जखमी चालकाला पोलिसांच्या मदतीने तातडीने रुग्णालयात नेले. जोगेश्वरी पोलिसांकडून सध्या या अपघात प्रकरणाचा तपास सुरु आहे.
Mumbai Road Accident: वेस्टर्न एक्स्प्रेस वेवर नेमकं काय घडलं?
पश्चिम द्रुतगती मार्गावर झालेल्या या अपघाताबाबत एका प्रत्यक्षदर्शीने माहिती देताना सांगितले की, रात्री दोनच्या सुमारास हा अपघात झाला. दादरा नगर हवेलीची पासिंग असलेल्या या पोर्शे कारची बीएमडब्ल्यू कारसोबत शर्यत सुरु होती. त्यावेळी या गाडीचा वेग तब्बल 150 किलोमीटर इतका होता. जोगेश्वरी मेट्रो स्थानकाजवळ चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि गाडी थेट दुभाजकावर जाऊन आदळली. ही टक्कर इतकी भीषण होती की, पोर्शे कारचे बोनेटे, दरवाजा या भागांचे तुकडे झाले आहेत. सुदैवाने टक्कर झाल्यानंतर पोर्शे कारमधील एअरबॅग्ज उघडल्या. त्यामुळे कार चालवणाऱ्या तरुणाचा जीव वाचला. मात्र, त्याला गंभीर दुखापत झाली आहे. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी येत पंचानामा केला. आता हा अपघात नक्की पोर्शे आणि बीएमडब्ल्यू कारच्या शर्यतीमुळे घडला आहे की, यामागे आणखी कोणते कारण आहे, याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत.
आणखी वाचा
ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने विचित्र अपघात, काळी-पिवळीची पलटी; दुचाकीचा चेंदामेदा, 8 जखमी
























