Mumbai Rain Mithi River: मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी, धडकी भरवणाऱ्या पावसामुळे मिठी नदीने गाठली धोकादायक पातळी
Mumbai Rain Mithi River: मुंबईत आज पहाटेपासून जोरदार पाऊस सुरु आहे. हवामान खात्याने मुंबईत पुढील तीन ते चार तासांमध्ये अत्यंत तीव्र सरी बसरण्याचा अंदाज वर्तवला आहे.

Mumbai Heavy Rain Mithi River: मुंबईत काल रात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाचा जोर सध्या वाढला आहे. मुंबई उपनगरात सध्या प्रचंड अंधारुन आले असून पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. पावसाचा जोर वाढल्याने रस्त्यांवर आणि रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने मुंबईतील वाहतूक ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. अशातच आता मुंबईकरांची (Mumbai News) चिंता वाढवणारी एक बातमी समोर आली आहे. 2005 साली मुंबईत तुफान पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी मिठी नदीला (Mithi River) पूर आला होता. सध्या सुरु असलेल्या पावसामुळे नागरिकांच्या मनातील याच काळ्या आठवणी जाग्या झाल्या आहेत. कारण गेल्या काही तासांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे मिठी नदीने धोकादायक पातळी गाठली आहे.
मिठी नदी सध्या 4.7 मीटरच्या पातळीवर पोहोचली आहे. आणखी काही तास पाऊस सुरु राहिल्यास मिठी नदीचे पाणी पात्राबाहेर येऊन माहीम, कुर्ला आणि साकीनाका या भागांमध्ये शिरु शकते. त्यामुळे पुढील काही तास मुंबईकरांच्यादृष्टीने महत्त्वाचे मानले जात आहेत. सध्या दक्षिण मुंबईत पावसाचा जोर कमी झाला असला तरी उपनगरात अजूनही जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे मिठी नदीच्या पाण्याची पातळी सातत्याने वाढत आहे. मुंबईची मिठी नदी कोपली की, मुंबईत हाहा:कार माजतो. याचा प्रत्यय मुंबईकरांनी आणि लगतच्या उपनगरांनी 26 जुलैच्या पावसात घेतला आहे. सध्या धो-धो कोसळणाऱ्या पावसामुळे मिठी नदी दुथडी भरून वाहत आहे. सध्या मिठी नदी 4.7 मीटरवरुन वाहत आहे. पण, मुसळधार पावसामुळे प्रशासन अलर्ट मोडवर असून मिठी नदीच्या लगतच्या भागात राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात येत आहे. तसेच, इतर भागांतील नागरिकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. असाच पाऊस सुरू राहिल्यास मिठी नदीच्या किनाऱ्यावरील कुर्ला, वांद्र्याच्या किनारी भागांत पाणी साचण्याची शक्यता आहे. मुसळधार पावसामुळे मुंबई महानगरपालिकेकडून फ्लड गेटस बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे कुर्ला, सायन, चुनाभट्टी, दादर, अशा भागात रुळांवर पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. ओहोटी सुरू होईपर्यंत पावसाचा जोर असाच राहिला तर प्रवाशांना फटका बसू शकतो
मुंबईत सकाळपासूनच पावसाने जोर पकडला आहे. समुद्र किनाऱ्यांजवळ वाऱ्याचा वेग देखील अधिक आहे. वांद्रे वरळी सी-लिंक परिसरात जोरदार वारे वाहत आहेत. सोबतच, दृश्यमानता देखील घटल्यानं चित्र आहे. सी-लिंकवरुन दिसणारे माहिम, दादर, वरळी हे भाग ढगांच्या दाटीमुळे हरवल्याचं चित्र आहे. मुंबई उपनगरांत मागील २४ तासात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. विक्रोळी परिसरात सर्वाधिक 255.5 मिमी पाऊस झाला आहे. सोबतच, भायखळा, सांताक्रुज, जुहू, वांद्रे परिसरात देखील अतिवृष्टी झाल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली.
आणखी वाचा























