(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai Rain Record: जोरदार...दमदार....जुलै महिन्यातील मुंबईतील पावसाचे विक्रम मोडीत
Mumbai Rain Record: यंदा मुंबईत जुलै महिन्यात झालेल्या पावसाने विक्रम रचला आहे.आतापर्यंत जुलै महिन्यात सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे.
Mumbai Rain Record: मागील काही दिवसांपासून मुंबईत कोसळत असलेल्या पावसाने जुलै महिन्यातील विक्रम मोडीत काढला आहे. विेशेष म्हणजे जुलै महिना संपण्यास अजूनही काही दिवस शिल्लक आहेत. गुरुवारीदेखील हवामान विभागाने मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबईच्या सांताक्रुझ वेधशाळेत जुलै महिन्यात 1557.8 मिमी पावसाची नोंद करण्यात आली असल्याचे भारतीय हवामान विभागाने माहिती दिली आहे.
जून महिन्यात मान्सूनचे आगमन लांबले होते. जून महिन्यात सरासरीपेक्षाही कमी पावसाची नोंद झाली होती. मात्र, जुलै महिन्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मागील काही दिवसांपासून पाऊस चांगलाच बरसत आहे. सांताक्रुझसाठी जुलै 2020 मध्ये आतापर्यंत सर्वाधिक पावसाची नोंद झाली होती. जुलै 2020 मध्ये 1502 मिमी पाऊस झाला होता. मात्र, आज 26 जुलै रोजी तो विक्रम मोडीत निघाला आहे, ज्यात 1 जुलै ते 26 जुलैपर्यंत सकाळी 8.30 पर्यंत 1433 मिमी पावसाची नोंद झाली होती.
मात्र, मुंबईमध्ये आज सकाळपासून सुरु असलेल्या पावसामुळे 26 जुलै रात्री 8.30 वाजता हा विक्रम मोडीत निघाला. सांताक्रुझ वेधशाळेत 1557.8 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
दरम्यान, अद्यापही जुलैचा महिना संपायला 3-4 दिवसांचा कालावधी आहे. सोबतच मुंबईला उद्या मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असल्याने जुलै महिन्यातील यंदाच्या हंगामात अधिक पावसाची नोंद होणार आहे.
आज मुंबईत रात्री 8.30 वाजेपर्यंत सांताक्रूझ 124 मिमी, कुलाबा 124.8 मिमी, दहिसर 52 मिमी, राम मंदिर 138.5 मिमी, चेंबूर 62.5 मिमी, भायखळा 101 मिमी, सीएसएमटी परिसर 111 मिमी, शीव 94.5 मिमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली.
रात्री 9.15 वाजेपर्यंत मुंबईतील विविध भागात झालेल्या पावसाची आकडेवारी
आज दिवसभर संततधार
मुंबईत आज सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू होती. मुंबई शहर आणि उपनगरात पावसाने दमदार हजेरी (Mumbai Rains) लावली. आज दिवसभर मुसळधार पावसाचा जोर राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला. आज कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक मुंबईकरांच्या मनात 26 जुलै 2005 च्या आठवणी जाग्या झाल्या. मुसळधार पावसातही सायंकाळी चार वाजेपर्यंत मुंबई लोकल ट्रेन वाहतूक सुरळीत सुरू होती. तर, काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती.
मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा धरण ओवरफ्लो
मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा धरण आज पहाटेच्या सुमारास ओवर फ्लो झाला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्यावतीने तानसा धरणाच्या खाली आणि तानसा नदीच्या काठावर वसलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच तहसीलदार पोलीस व महानगरपालिका यांना सतर्क राहण्याचे देखील सांगण्यात आले आहे. तानसाच्या पाण्यामुळे तानसा, शहापूर, भिवंडी, वसई तालुक्यातील अनेक गावांना फटका बसतो. त्यामुळे या भागात देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात पैकी चार तलाव भरले आहेत. सध्या तलावातील एकूण पाणीसाठा हा 55 टक्क्यांच्या आसपास पोहचला आहे.