(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुसळधार पावसात पर्यटनाचा अतिउत्साह, सीबीडीच्या डोंगरावर फिरायला गेलेल्या 350 जणांना वाचवलं, डोंबिवलीतही थरारक रेस्क्यू ऑपरेशन
Mumbai Rain : मुसळधार पावसात पर्यटनाचा अतिउत्साह पर्यटकांना भोवला. सीबीडीच्या डोंगरावर फिरायला गेलेल्या 350 जणांना वाचवलं, तर डोंबिवलीतही थरारक रेस्क्यू ऑपरेशन
Mumbai Rain : मुंबईसह संपूर्ण राज्यात मुसळधार पावसनं धुमाकूळ घातला आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दुर्घटना घडल्या. काही लोकांना आपला जीवही गमवावा लागला. एकीकडे प्रशासनासह मुख्यमंत्र्यांकडूनही गरजेशिवाय बाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात येत आहे. पण नागरिकांनी कोरोनासह सर्व नियम धाब्यावर बसवत फिरण्यासाठी बाहेर पडले होते. त्यांचा अतिउत्साहीपणा नागरिकांना चांगलाच महागात पडला आहे.
मुसळधार पावसात गरज नसल्यास घराबाहेर पडू नका असं स्वतः मुख्यमंत्री आणि प्रशासकीय यंत्रणांकडूनही सातत्यानं आवाहन केलं जात होतं. पण अशातच काही नागरिकांना त्यांचा अतिउत्साहीपणा चांगलाच भोवला आहे. नागरिकांच्या याच बेफिकीरपणामुळे नवी मुंबईतील काही नागरीक अनेक तास पावसात अडकून पडले होते. नवी मुंबईच्या सीबीडी भागात असलेल्या एका डोंगरातून काल तब्बल 350 जणांची अग्निशमन दलानं सुटका केली आहे. काल रविवारच्या दिवशी काही नागरीक लहान मुलांसह फिरण्यासाठी गेले होते. मात्र मुसळधार पावसानं ओढ्याचं पाणी वाढलं, अन् या पाण्याचा वेग इतका भयंकर होता की, नागरिकांचा परतीचा मार्गच बंद झाला. अखेर या नागरिकांच्या सुटकेसाठी अग्निशमन दलाला धाव घ्यावी लागली. अग्निशमन दलानं या ओढ्यात मानवी साखळी करून तब्बल 350 जणांची सुखरुप सुटका केली आहे. यामध्ये अनेक लहान मुलंही होती. त्यामुळे नागरिकांनो पावसाळा आहे, नसतं धाडस करून धोका ओढवून घेऊ नका, असं आवाहन एबीपी माझाही करत आहे.
सीबीडीपाठोपाठ डोंबिवलीतील शीळफाटा येथेही काही नागरिकांचा अतिउत्साह पाहायला मिळाला. नेहमीच होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळं दुषणांचा धनी ठरणारा मार्ग म्हणजे, डोंबिवलीकडे जाणारा शिळफाटा. मात्र या शिळफाट्यावर काल वाहनांचं नव्हे तर जनतेचं ट्रॅफिक जाम पाहायला मिळालं. मुसळधार पावसामुळं शिळफाटा मार्गाची काय अवस्था झाली होती हे वेगळं सांगण्याची गरज नाही. दरम्यान पावसाच्या प्रवाहातून वाचण्यासाठी मानवी साखळी तयार करण्यात आली होती. पाण्याखाली गेलेल्या रस्त्यातून जीव मुठीत धरुन वाट काढावी लागत होती. शिळफाटा परिसरातल्या जवळपास सगळ्याच दुकानात पाणी शिरलं होतं.
पुढचे 24 तास मुंबईसह कोकणाला अतिवृष्टीचा इशारा
मुसळधार पावसामुळं काल मुंबईत मृत्यूतांडव पाहायला मिळालं. दरड आणि भिंत कोसळण्याच्या वेगवेगळ्या दुर्घटनेत 30 जणांना जीव गमवावा लागला. पावसाचं हे रौद्र रुप पाहुन मुंबईसह लगतच्या शहरांची झोप उडाली असतानाच, आज मुंबईसह कोकणाला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. आज रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर 19 ते 22 जुलै या कालावधीसाठी मुंबई, ठाणे, पालघरला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर दुसरीकडे सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, पुणे, सातारा, सांगली, नांदेड, बीड, जालना, औरंगाबाद, नाशिक, धुळे, जळगाव आणि परभणीत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :