Mumbai Rain : मुंबईत मुसळधार पाऊस, अंधेरी सब वे मध्ये तीन ते चार फूट पाणी
मुंबईत सकाळपासून पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळं मुंबईत अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं आहे.
Mumbai Rain : मुंबईत आज पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. काल दिवसभर मुंबईत पावसाची संततधार बघायला मिळाली होती. रात्री झालेल्या पावसामुळं सखल भागात अनेक ठिकाणी पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. सकाळपासून पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे. मुंबईत अंधेरी, गोरेगाव, कांदिवली, बोरिवली, सांताक्रूझ, वांद्रे, कुर्ला, सायन, मुलुंड, दादर, परळ परिसरात जोरदार पाऊस सुरु झाला आहे. मुसळधार पावसामुळं अंधेरी सब वे मध्ये तीन ते चार फूट पाणी साचलं आहे. या मार्गावरची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. तसेच वांद्रे कलानगर जंक्शन समोरील मुख्य रस्त्यावर 2 फूट पाणी तुंबल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळं रस्त्याला तलावाचे स्वरूप आलं आहे.
#WATCH | Rain continues to lash parts of Mumbai. Visuals from near Hindmata, Dadar area pic.twitter.com/oSB7zd9NEr
— ANI (@ANI) July 1, 2022
मुंबईत सकाळपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळं मुंबईच्या अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. किंग्ज सर्कल या भागात जोरदार पावसामुळं पाणी साचत असतं, मात्र पालिकेकडून पाण्याच्या साठवणुकीच्या टाक्या बसवण्यात आल्यानं अद्याप साचलं नाही. मागील 24 तासात मुंबईत अतिवृष्टी झाली आहे. पुढील 24 तासातही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईत हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबईत आणखी काही तास मुसळधार पाऊस पडल्यास मुंबईतील सखल भागात पाणी तुंबणार आहे. सकाळी मुंबईकर आपापल्या कामाला निघाले आहेत. मात्र मुसळधार पावसामुळं वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर ट्रॅफिक जाम आहे. त्यामुळं मुंबईकरांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
दरम्यान, कालपासून सुरु असलेल्या पावसामुळं अंधेरी सब वे, हिंदमाता, सक्कर पंचायत वडाळा, एसआयईएस कॉलेज वडाळा, किंग्ज सर्कल, सायन आदी काही सखल भागात काही प्रमाणात पाणी साचले. त्यामुळे रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे. दरम्यान, वसई विरार आणि मीरा भाईंदर शहरात बुधवारी रात्रभर पावसाच्या रिमझिम सरी बरसत आहे. तर अधून मधून जोरदार पाऊस आहे. काल दुपारनंतर वसई विरार मध्ये पावसाने जोर धरलेला पाहायला मिळाला आहे. वसई, नालासोपारा आणि विरार मधील सखल भागात पाणी साचण्यास सुरूवात झाली. यामुळे पालिकेचा नालेसफाई दावा फोल ठरल्याच दिसून येत आहे.