Mumbai Rain: मुंबईच्या पश्चिम उपनगरात जोरदार पावसाला सुरुवात; आज अन् उद्या मुंबईला यलो अलर्ट
Mumbai Rain: मुंबई उपनगरात गेल्या 15 मिनिटांपासून अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे.

Mumbai Rain मुंबई: मुंबईच्या पश्चिम उपनगरात (Rain In Mumbai) मागील 10 ते 15 मिनिटांपासून जोरदार अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. आज (13 मे) पश्चिम उपनगरात सकाळपासून ढगाळ वातावरण होतं. त्यानंतर सकाळी 9 वाजल्यानंतर मुंबईत जोरदार पाऊस सुरु आहे.
पश्चिम उपनगरात अंधेरी,जोगेश्वरी,गोरेगाव मालाड,कांदिवली,विलेपार्ले, सांताक्रुझ, परिसरात सध्या जोरदार अवकाळी पाऊस सुरू आहे. जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, मुंबईला आज (मंगळवार) आणि उद्या (बुधवार)साठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. ठाणे आणि मुंबईमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून दक्षिण कोकणामध्येही ‘यलो ॲलर्ट’ देण्यात आला आहे. अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांच्या घाट परिसरात पावसाचा ॲलर्ट देण्यात आला आहे.
तळकोकणात सावंतवाडी तालुक्यात अवकाळी पाऊस
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील बांदा, इन्सुली, आकेरी परिसरात काल जोरदार अवकाळी पाऊस कोसळला. अवकाळी पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना वातावरणात गारवा निर्माण झाल्याने दिलासा मिळाला. सिंधुदुर्गात काही ठिकाणी ढगाळ तर काही ठिकाणी कडक उन पडले आहे.
नाशिकमध्ये सलग पाचव्या दिवशी अवकाळी पावसाने झोडपले-
सलग पाचव्या दिवशी नाशिककरांना अवकाळी पावसाने झोडपून काढले काल दुपारच्या सुमारास नाशिक शहरात वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे नाशिक शहराच्या मध्यवस्तीतील रस्त्यांना अक्षरशः नदी नाल्याचा रूप आलं होतं. अचानक आलेल्या पावसानं जनजीवन विस्कळीत झालं तर, नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली 15 ते 20 मिनिट नाशिककरांना पावसांने झोडपून काढले.

















