VIDEO : मुंबईत मराठी माणसांवर अन्याय सुरूच; केवळ मराठी असल्यानेच तरुणाला नोकरी नाकारली, मराठी नकोत, कंपनीच्या मालकाची भूमिका
Mumbai Marathi Language News : मराठी पोरं आमच्याकडे कामाला योग्य नाहीत असं सांगत मुंबईतील राधेशाम ब्रदर्स कंपनीच्या मालकाने मराठी तरुणाला नोकरी नाकारल्याची घटना घडली.
मुंबई : मराठी बोलण्याचा आग्रह धरणाऱ्या तरुणालाच मुंब्र्यात माफी मागायला लावल्याची घटना ताजी असतानाच आता परप्रांतीय व्यापाऱ्याने मराठी मुलांना नोकरीच देणार नसल्याचं जाहीर केल्याचं समोर आलं आहे. मुंबईतील मरीन लाईन येथील राधेशाम ब्रदर्स कंपनीच्या मालकाने मुलाखतीसाठी गेलेल्या मराठी तरुणाला नोकरी नाकारली. मराठी मुलं आमच्या कामासाठी सूट होत नसल्याचं कंपनीच्या मालकाने सांगितलं. या प्रकारानंतर शिवसेना ठाकरे गटाचे विभाग प्रमुख संतोष शिंदे यांनी त्या मालकाला जाब विचारत चांगलेच फैलावर घेतलं.
मराठी मुलं आमच्याकडे कामाला येतात आणि दोन दिवसात सोडून जातात. म्हणून आम्हाला मराठी पोर कामाला नको. ते आमच्या कामासाठी योग्य नाहीत अशी भूमिका राधेशाम ब्रदर्स कंपनीच्या मालकाने घेतली. मुलाखतीला आलेल्या मराठी मुलाला त्याने नोकरी नाकारली. तसेच इतर तीन मराठी मुलांचे बायोडेटाही त्याने बाजूला सारल्याची घटना घडली.
मग महाराष्ट्रात धंदाच करू नका
महाराष्ट्रात असून मराठी तरुणांना नोकरी नाकारता. मग महाराष्ट्रात धंदाच करू नका असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाच्या संतोष शिंदे यांनी कंपनीच्या मालकाला चांगलेच फैलावर घेतलं. महाराष्ट्रात कंपनी सुरू करायची आणि मराठी मुलांनाच नोकरी नाकारायची हे चालणार नाही असा इशारा यावेळी शिवसेनेच्या वतीने देण्यात आला.
मराठी नकोतच, मालकाची भूमिका कायम
केवळ मराठी असल्यानेच नोकरी नाकारल्यानंतर कंपनीच्या मालकाला जाब विचारण्यासाठी ठाकरे गटाचे संतोष शिंदे गेले. पण त्याही वेळी कंपनीच्या मालकाने आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांची भूमिका कायम ठेवली. मराठी मुलं आमच्या कंपनीला सूट होत नाहीत. ते दोन चार दिवसात नोकरी सोडून जातात अशी त्यांनी भूमिका कायम ठेवल्याचं व्हिडीओमधून स्पष्ट होतंय. कंपनीचा मालक आणि त्यांचे सहकारी हे मराठी तरुणांना नोकरी नाकारण्याच्या भूमिकेचं समर्थन करताना दिसतात.
मराठी माणसांवर वाढता अन्याय
गेल्या काही दिवसांपासून मुंबईतच मराठी माणसांवर मराठी न बोलण्यासाठी दबाव टाकण्यात येत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. गिरगावात एका मराठी महिलेला मराठी बोलू नका, मारवाडीत बोला असं धमकावण्यात आलं. त्यानंतर कल्याणमध्ये एका मराठी कुटुंबाला हिंदी भाषिक गुंडांनी मारहाण केल्याची घटना घडली. त्यानंतर मुब्र्यात मराठी तरुणाला माफी मागायला लावली आणि आता मराठी तरुणाला नोकरीच नाकारल्याची घटना घडली.
मुब्र्यात मराठी तरुणालाच माफी मागायला लावली
एका मराठी तरुणानं आपल्याच महाराष्ट्रात मराठी बोलण्याचा आग्रह धरला आणि त्यासाठी त्याच्यावर चक्क कान पकडून माफी मागण्याची वेळ आली. हा प्रकार घडला ठाणे जिल्ह्यातल्या मुंब्र्यात. एका अमराठी विक्रेत्याला मराठी भाषेत बोलण्याचा आग्रह केल्यानंतर इतका राग आला की त्यानं जमाव गोळा करत मराठी तरुणावरच दादागिरी केली. विशेष म्हणजे पोलिसांनीदेखील हा सगळा प्रकार सहन करणाऱ्या मराठी तरुणावरच गुन्हा दाखल केला. या घटनेमुळं सध्या राज्यभर संतापाची लाट पसरली आहे.