सोशल मीडियावर आत्महत्या करण्याबाबत पोस्ट, मुंबई पोलिसांनी वाचवले दोघांचे प्राण
Mumbai Police : मुंबई पोलिसांनी आतापर्यंत आठ अशा लोकांचे जीव वाचवले आहेत जे काहीतरी तणावात आत्महत्या करण्याचं पाऊल उचलायला निघाले होते. या लोकांनी आपण आत्महत्या करणार आहोत, अशा आशयाची पोस्ट सोशल मीडियावर केली होती.
मुंबई : मुंबई पोलिसांनी आतापर्यंत आठ अशा लोकांचे जीव वाचवले आहेत जे काहीतरी तणावात आत्महत्या करण्याचं पाऊल उचलायला निघाले होते. या लोकांनी आपण आत्महत्या करणार आहोत, अशा आशयाची पोस्ट सोशल मीडियावर केली होती. 16 फेब्रुवारी रोजी मुंबई सायबर पोलिसांनी दोन लोकांचे जीव वाचवले. सायबर डीसीपी डॉ रश्मी करंदीकर यांनी सांगितलं की, 16 तारखेला रात्री 9.30 वाजता एका व्यक्तीनं शिवाजी पार्क पोलिसांना माहिती दिली होती की, एक मुलगा फेसबुकवर आत्महत्या करण्याविषयी बोलत आहे. शिवाजी पार्क पोलिसांनी ही माहिती सायबर पोलिसांना दिली.
यानंतर लगेच सायबर पोलिसांनी फेसबुकची मदत मागितली आणि त्या मुलाचं लोकेशन शोधून काढलं. सदर मुलगा मालाड परिसरात राहात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस तात्काळ त्या ठिकाणी पोहोचले आणि त्या मुलाचा जीव वाचवला. करंदीकर यांनी सांगितलं की, हा मुलगा 21 वर्षाचा आहे आणि त्याची सावत्र आई त्याला त्रास देत होती असं त्याचं म्हणणं आहे.
त्या मुलानं सांगितलं की, त्याच्या वडिलांनी 55 वर्षांच्या वयात दुसरं लग्न केलं आहे. त्याच्या सावत्र आईने घरची सगळी संपत्ती हडप केली आहे. ती मिळवण्यासाठी त्याने अनेक प्रयत्न केले मात्र त्याला मदत मिळाली नाही. म्हणून त्याने मंगळवारी डिप्रेशनमध्ये आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. त्याने आत्महत्या करण्यासंबंधी पोस्ट फेसबुकवर शेअर केली. त्यानंतर त्याच्या मित्रयादीतील एका व्यक्तिने याबाबत शिवाजी पार्क पोलिसांना माहिती दिली.
अभ्यासाच्या भीतीनं आत्महत्येचा प्रयत्न
करंदीकर यांनी सांगितलं की, सोमवारी मुंबई पोलिस कंट्रोलनं ट्विटरवर एक ट्वीट पाहिलं. ज्यात एक मुलाने आत्महत्या करण्याविषयी लिहिलं होतं. पोलिस कंट्रोल रुमनं याबाबत सायबर पोलिसांना माहिती दिली. यानंतर सायबर पोलिसांनी ट्विटरची मदत घेतली. ट्विटरनं तात्काळ या मुलाचं लोकेशन औरंगाबाद असल्याचं सांगितलं. करंदीकर यांनी तात्काळ औरंगाबाद जिल्हा पोलिस अधीक्षकांना याबाबत माहिती दिली. औरंगाबाद पोलिसांनी लगेच लोकेशनवर जात या मुलाचा जीव वाचवला. पोलिसांनी या मुलाला विचारलं असता त्यानं सांगितलं की, तो 12 वीत शिकत आहेत, अभ्यासाची भीती असल्यानं त्यानं हे पाऊल उचललं.