Mumbai Police : 1993 च्या दंगलखोरांना नडणाऱ्या पोलीस आयुक्त संजय पांडेंसमोर पुन्हा 'तेच' आव्हान
Mumbai Police commissioner Sanjay Pandey : मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी 1993 च्या दंगलीत शांतता कायम ठेवण्यासाठी उल्लेखनीय काम केले होते. आता मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.
Mumbai Police : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईने 1992-93 मध्ये धार्मिक दंगलीच्या झळा सहन केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय शहर असलेल्या मुंबई उसळलेल्या दंगलीमुळे राज्य सरकारही चिंतेत होते. दंगल रोखण्यासाठी पोलीस दलाकडून विविध पातळीवर प्रयत्न सुरू होते. मुंबईत दंगल रोखण्यासाठी आणि शहरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी उल्लेखनीय कामगिरी करणारे तत्कालीन पोलीस उपायुक्त संजय पांडे यांच्यासमोर पुन्हा एकदा 30 वर्षांनी शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे आव्हान आहे. मात्र, यावेळी संजय पांडे हे मुंबई पोलीस दलाचे प्रमुख आहेत. लाउडस्पीकरच्या मुद्यावरून मुंबईसह राज्यात चिंतेचे वातावरण आहे. तर, दुसरीकडे पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कंबर कसली आहे.
आयआयटी कानपूरमधून आयटी कॉम्प्युटरमध्ये इंजिनीअरिंगचं शिक्षण घेतलेले संजय पांडे हे 1986 च्या बॅचमधील IPS अधिकारी आहेत. त्यांनी सर्वात आधी पुण्यात सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून पुणे शहरात कामाला सुरुवात केली होती. त्यानंतर मुंबईतील डीसीपी रँकचे अधिकारी झाले. बाबरी मशिद पाडून कारसेवा करण्याचे आवाहन, रामरथ यात्रा यामुळे मुंबईत तणाव निर्माण झाला होता. परिणामी मुंबईतील विविध भागात दंगल उसळली होती. बहुधर्मीय असलेल्या धारावीमध्ये 1992 च्या दंगलीच्या काळात दंगल नियंत्रण आणि सामाजिक एकोप्यासाठी पहिल्यांदा मोहल्ला समितीची स्थापना केली होती. त्याशिवाय त्यांनी काही कठोर पावलेही उचलली होती. संजय पांडे यांच्या पावित्र्यामुळे काही राजकीय नेते दुखावले गेले असल्याची चर्चा आजही सुरू असते. मुंबई झालेल्या दंगलीच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या श्रीकृष्ण आयोगानेदेखील संजय पांडे यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले होते.
आता, मुंबईचे पोलीस आयुक्त असलेल्या संजय पांडे यांच्यासमोर पुन्हा एकदा शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे आव्हान आहे. लाऊडस्पीकरच्या मुद्यावरून मुंबईसह राज्यात वातावरण तापले असताना दुसरीकडे मुंबई पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले आहे. मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर वॉच ठेवण्यात येत असून कायदा आणि सुव्यस्था राखण्यासाठी पावले उचलली जात आहेत. पोलीस आयुक्तांनी मागील काही दिवसांपासून अधिकाऱ्यांच्या बैठका सुरू केल्या आहेत. त्यामुळे मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे आव्हान पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्यासमोर आहे.
संजय पांडे यांची पोलीस दलातील सेवा
संजय पांडे यांनी 1995 मध्ये नार्कोटिक्स विभागाचे डीसीपी म्हणून शहरातील ड्रग्ज रॅकेटला आळा घातला. तर, 1997 आर्थिक गुन्हे शाखेत असताना अभ्युदय बँक घोटाळा, चमडा घोटाळ्याचा तपास करुन भ्रष्टाचाराचा उलगडा केला. 1999 मध्ये SPG मध्ये असताना माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सुरक्षेत तैनात होते. 2014-15 वैध मापनशास्त्र विभागात असताना संजय पांडे यांनी बिल्डरांकडून फ्लॅट्सच्या कार्पेट एरियातील चोरी उघड केली. लोढा बिल्डरवर कारवाईही केली. काहीशा दुर्लक्षित असलेल्या विभागाला त्यानी पुन्हा एकदा प्रकाशझोतात आणले होते. मुंबई पोलीस आयुक्तपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी मुंबईकर आणि पोलिसांमध्ये सहकार्य, विश्वासाची भावना वाढवण्यासाठी उपक्रम सुरू केले आहेत. त्याशिवाय फेसबुकच्या माध्यमातून ते संवाद साधत असतात.