(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सोन्याच्या व्यवसायातील नुकसान भरून काढण्यासाठी करायचा घरफोडी, मानपाडा पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Crime News : तीन सराईत चोरट्यांना मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. अभिजीत रॉय, इम्रान खान आणि रियाज खान अशी या तिन्ही चोरट्यांची नावे आहेत.
मुंबई : घरफोडीच्या गुन्ह्यातील तीन सराईत चोरट्यांना मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. अभिजीत रॉय, इम्रान खान आणि रियाज खान अशी या तिन्ही चोरट्यांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून 71 तोळे सोन्याचे आणि चांदीचे दागिने असा 36 लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिजीत रॉय याचा सोने गाळण्याचा व्यवसाय होता. या व्यवसायात त्याला नुकसान झालं होतं. हे नुकसान भरून काढण्यासाठी त्याने घरफोडी करत सोने चोरण्याचा मार्ग अवलंबला. अभिजीत विरोधात या आधी मुंबई , मिरा भाईंदर, वसई, विरार परिसरात 13 घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.
मानपाडा पोलिसांच्या हद्दीत दिवसा ढवळ्या घरपोडीचे प्रकार वाढले होते. या पार्श्वभूमीवर मानपाडा पोलिसांनी सीसीटिव्ही आणि तांत्रिक तपास करत आरोपींचा शोध सुरू केला. सीसीटिव्ही आणि तांत्रिक तपासाच्या आधारे अभिजीत रॉय याला अटक केली.
मुळचा पश्चिम बंगालचा असलेला अभिजित रॉय हा भायखळा परिसरातील कामाठीपुरा परिसरात राहतो. मुंबई वरून डोंबिवली आणि वसई विरार पर्यंत लोकलने प्रवास करत तो घराला कुलूप असलेले आणि फोडताना फारसे कष्ट घ्यावे लागणार नाह असे सुरक्षा रक्षक नसलेले घर निवडायचा. त्यानंतर कडी कोयंडा उचकटून घरफोडी करत असे. त्याच्याकडून मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सहा गुन्ह्यांची उकल करण्यात आली.
अटक केलेले इम्रान खान आणि रियाज खान यांची देखील गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. या दोघांकडून एक लाख 18 हजर रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या दोघांकडून मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चार गुन्हे उघडकीस आणले आहेत. हे दोघे एमआयडीसी मधील बंद कारखान्यातील छोट्या मोठ्या साहित्यची चोरी करून भंगारात विकून उपजीविका करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
डोंबिवली पोलीस ठाण्याचे एसीपी सुनील कुराडे, मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे, एपीआय अविनाश वणवे, सुनील तारमळे आणि त्यांच्या पथकाने सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने आरोपीचा माग काढत दहा गुन्हे उघडकीस आणत तीन जणांना अटक केली.