School Bus : मुंबईतील वाहतूक कोंडीच्या ठिकाणी असलेले स्कूल बसचे थांबे बंद होणार?
School Bus : वाहतूक पोलिसांच्या येणाऱ्या सततच्या दंडाला कंटाळून मुंबईतील वाहतूक कोंडीच्या ठिकाणी असलेले स्कूल बसचे थांबे बंद करण्याचा निर्णय स्कूल बस मालक घेणार आहेत.
Mumbai News : वाहतूक पोलिसांच्या (Traffic Police) सततच्या दंडाला कंटाळून मुंबईतील (Mumbai) वाहतूक कोंडीच्या (Traffic Jam) ठिकाणी असलेले स्कूल बसचे (School Bus) थांबे बंद करण्याचा निर्णय स्कूल बस मालक घेणार आहेत. यावर तोडगा न काढल्यास 3 जानेवारीपासून मुंबईतील स्कूल बस मालक वाहतूक कोंडीत असलेले स्टॉप बंद करण्याचा निर्णय घेणार आहेत.
वारंवार होणाऱ्या दंडाला स्कूल बस मालक कंटाळले
वाहतूक कोंडीत विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी घेतलेल्या स्टॉपवर वाहतूक पोलिसांकडून दंड बसत असल्याने स्कूल बस चालक-मालक त्रस्त आहेत. अंधेरीसह, पश्चिम उपनगर आणि संपूर्ण मुंबईमध्ये अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. या वाहतूक कोंडीतच स्कूल बसचे मुलांना सोडण्यासाठी स्टॉप आहेत. मात्र ठरलेल्या स्टॉपवर विद्यार्थ्यांना सोडताना ट्रॅफिकला अडथळा येत असल्यास निदर्शनास आल्यानंतर वाहतूक पोलिसांकडून स्कूल बस चालकांना वारंवार दंड ठोठावला जात आहे. त्यामुळे अशाप्रकारे दंड ठोठावला जात असल्याने वाहतूक कोंडीतील विद्यार्थ्यांना सोडण्याचे स्टॉप बंद करण्याचा निर्णय स्कूल बस मालकांनी घेण्याचा ठरवलं आहे.
पिक अवर लक्षात घेऊन अर्धा तास आधी शाळा सोडण्यासाठी नियोजन करावं : स्कूल बस मालक
अंधेरीचा गोखले ब्रिज बंद झाल्यानंतर अंधेरी आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर पिक अवरला (Pick Hour) वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे सायंकाळी पाच वाजता शाळा सुटल्यानंतर सर्व मुलांना घरी सोडण्यासाठी एक ते दीड तास लागतो. चालकांना अनेक शिफ्टचं व्यवस्थापन करता येत नाहीत आणि शाळेच्या वेळा जुळत नाहीत. त्यामुळे आमच्यावरील आणि वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी शाळांनी सुद्धा पिक अवर लक्षात घेऊन अर्धा तास शाळा आधी सोडून तशाप्रकारचे नियोजन करावे अशी मागणी सुद्धा स्कूल बस मालकांनी केली आहे.
मुंबई मेरी जॅम...
एकीकडे विकास काम तर दुसरीकडे ट्रॅफिक जॅम. हे चित्र मुंबईच्या अनेक भागातल्या रस्त्यावर पाहायला मिळतं. मग ते दक्षिण मुंबई असू द्या किंवा मग पूर्व उपनगर किंवा पश्चिम उपनगर... कुठेही जा ...मुंबई मेरी जॅम... आणि या वाहतूक कोंडीतूनच रोजचा प्रवास मुंबईकरांना करावा लागतो. एकीकडे मुंबईत वाहनांची संख्या मागील पाच वर्षात दहा पटीने वाढलीये. तर दुसरीकडे पायाभूत सुविधांसाठी, विकास कामांसाठी रस्ते खोदून ठेवल्याने तर काही ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडल्याने मुंबईतल्या अनेक ठिकाणावरची वाहतूक कासवगतीने सुरू आहे. तर मुंबईतल्या अनेक मार्गावर वाहतूक कोंडीची बेटे तयार झाली आहेत. "सरकार योग्य पद्धतीने नियोजन करत नाही. त्यामुळे वाहतूक कोंडी अनेक ठिकाणी पाहायला मिळते. नुसतं नियोजन करुन होणार नाही तर त्याची अंमलबजावणी सुद्धा करायला हवी," असं मत वाहतूक नियोजन तज्ज्ञ रोहित कात्रे यांनी नोंदवलं आहे.