Mumbai News: बोरीवलीतील उच्चभ्रू सोसायटीच्या फ्लॅटमध्ये आढळला ज्येष्ठ महिलेचा कुजलेला मृतदेह, सर्वत्र प्रचंड खळबळ
सुलोचना यांच्या फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याची तक्रार येथील रहिवाशांनी केली. पोलिसांनी त्यांच्या घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला तेव्हा त्यांना सुलोचना या मृत स्थितीत आढळला.
मुंबई : बोरिवली (Borivali) येथील राजेंद्र नगरमध्ये एका उच्चभ्रू इमारतीत 78 वर्षीय ज्येष्ठ महिलेचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळून आला आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली (Mumbai News) असून त्या घरात आजारी पती सोबत राहत होत्या. या प्रकरणी कस्तुरबा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पोलिस पुढील तपास करत आहेत. सुलोचना भास्कर शेट्टी असे मयत महिलेचे नाव आहे.
बोरिवली येथील राजेंद्र नगरच्या एकता भूमी या उचभ्रू इमारतीच्या के विंग मध्ये पाचव्या मजल्यावर राहत होत्या. सुलोचना यांच्या फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याची तक्रार येथील रहिवाशांनी केली. ही माहिती मिळताच बोरिवली पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. फ्लॅट उघडला त्यावेळी सुलोचना यांचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळला.त्यांची मुलगी त्यांना दोन दिवसांपासून संपर्क करण्याचा प्रयत्न करत होती पोलिसांनी त्यांच्या घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला तेव्हा त्यांना सुलोचना या मृत स्थितीत आणि त्यांचे पती आजारी स्थितीत आढळून आले. सुलोचना यांना मुलगी असून तिला कळविल्याचे पोलिसांनी सांगितले. सुलोचना भास्कर यांचा मृत्यू दोन दिवसांपूर्वी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदनाच्या अहवालानंतर स्पष्ट होईल, असेही पोलिसांनी म्हटले आहे.
मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट नाही
पोलिसांनी सुलोचनाा यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला आहे. त्यांच्या अंगावर काहीही खूना नसल्यामुळे त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही. फ्लॅटमध्येही काही संशयास्पद वस्तू आढळून आलेल्या नाही. याप्रकरणी कस्तुरबा पोलिस अधिक तपास करत आहेत.