(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai Local : लोकलमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठांसाठी खूशखबर, आता माल डब्याचे रुपांतर ज्येष्ठांसाठी राखीव डब्यात करणार
Mumbai Local : आता लोकलच्या मालडब्याचे रुपांतर ज्येष्ठांसाठी राखीव डब्यात केले जाणार आहे. जनहित याचिकेच्या उत्तरादाखल मध्य रेल्वेने मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे.
Mumbai Local : लोकल ट्रेन ही मुंबईकरांची लाईफलाईन आहे. लाखो मुंबईकर लोकल ट्रेनमधून (Local Train) प्रवास करतात. परंतु ज्येष्ठ प्रवाशांना नेहमीच लोकलमध्ये बसण्यासाठी धावपळ करावी लागते मात्र आता मध्य रेल्वेने (Central Railway) यावर उपाय शोधला आहे. आता लोकलच्या मालडब्याचे रुपांतर ज्येष्ठांसाठी राखीव डब्यात केले जाणार आहे. जनहित याचिकेच्या उत्तरादाखल मध्य रेल्वेने मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे.
लोकलमधील मालडब्यांतील आसने वाढवण्यासाठी मध्य रेल्वेचे नियोजन पूर्ण केलं आहे. के.पी. पुरुषोत्तम्म नायर यांनी रेल्वे प्रशासना विरुद्ध दाखल केलेल्या जनहित याचिकेला उत्तर दिले
मालडब्यात बदल करुन आसन क्षमता वाढवणार
मध्य रेल्वेने केलेल्या सर्वेक्षणात माल डब्यातील 90 टक्के प्रवासी सर्वसामान्य असल्याचे दिसून आल्याने, माल डब्यात आवश्यक ते बदल करुन आसन क्षमता वाढवून ते डबे ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव करण्यात येणार आहे. त्यामुळे आता रेल्वेच्या 12 डब्यांच्या लोकलमध्ये 88 आसनांसह चार प्रथम श्रेणीचे डबे, तीन महिला डबे, दिव्यांग प्रवाशांसाठी 38 आसनांचे दोन डबे आणि उर्वरित डबे सर्वसामान्यांसाठी राखीव असतील.
कोण आहेत के. पी. पुरुषोत्तम्म?
के.पी. पुरुषोत्तम्म नायर नावाच्या ज्येष्ठ नागरिकाने ही याचिका हायकोर्टात दाखल केली आहे. के.पी. पुरुषोत्तम्म नायर हे स्वत: ज्येष्ठ नागरिक असून ते दररोज वांद्रे ते चर्चगेट असा लोकल ट्रेनमधून प्रवास करतात. ट्रेनमधून प्रवास करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, असं त्यांनी आपल्या याचिकेत नमूद केलं आहे.
याचिकेत काय म्हटलं होतं?
मुंबईतील उपनगरीय रेल्वेमधून दररोज सुमारे 50 हजार ज्येष्ठ नागरिक प्रवास करतात. पीक अवरमध्ये तरुण प्रवाशांनाच ट्रेनमध्ये चढताना मोठी कसरत करावी लागते. अशात ज्येष्ठ नागरिकांना ट्रेनमध्ये जागा मिळणं कठीण होतं. कारण सेकंड क्लास डब्यात ज्येष्ठांसाठी केवळ 14 सीट आरक्षित असतात. पीक अवरमध्ये तरुण प्रवासी त्यावर बसलेले असल्याने त्या सीट देखील ज्येष्ठांना मिळत नाहीत. शिवाय आरक्षित जागेवर बसू देण्याच्या विनंतीकडे संबंधित तरुण प्रवासी दुर्लक्ष करतात.
हेही वाचा