Mumbai: धक्कादायक! दोन दिवसांपासून बेपत्ता, मुंबईच्या समुद्रात मर्चंट नेव्ही कर्मचाऱ्याचा मृतदेह तरंगताना दिसल्याने खळबळ
मुंबईच्या समुद्रात मर्चंट नेव्ही कर्मचाऱ्याचा मृतदेह सापडल्याने खळबळ! बेपत्ता कर्मचार्याचा मृतदेह ससून डॉकजवळ आढळला

Mumbai: मुंबईच्या समुद्रात मर्चंट नेव्हीच्या एका कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सुनिल पाचार (वय 23) असे मृत तरुणाचे नाव असून,तो राजस्थानचा मुळ रहिवाशी असल्याचं कळतंय. तो गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होता. अखेर 5 फेब्रुवारी रोजी ससून डॉकजवळ स्थानिकांना त्याचा मृतदेह आढळला. या घटनेने अनेक प्रश्न निर्माण केले असून, सुनिलच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे. दोन दिवसांपासून बेपत्ता असणारा हा अधिकाऱ्याचा मृतदेह बुधवारी रात्री समुद्रात तरंगताना दिसल्याने मोठी खळबळ उडाली आहे. (Mumbai News)
रात्री डेकवर झोपला आणि बेपत्ता झाला
सुनिल पाचार हा मर्चंट नेव्हीमध्ये कार्यरत होता आणि नोव्हेंबर 2024 पासून तो या जहाजावर काम करत होता. 3 फेब्रुवारीच्या रात्री तो जहाजाच्या डेकवर झोपला होता. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी सहकाऱ्यांनी पाहिले असता तो दिसला नाही. जहाजावर सर्वत्र शोध घेतल्यानंतरही तो न सापडल्याने कर्मचार्यांनी यलो गेट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. दोन दिवस उलटले तरी त्याचा काहीही शोध लागत नव्हता. 5 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास ससून डॉक परिसरात काही स्थानिकांना समुद्रात मृतदेह तरंगताना दिसला. त्यांनी तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली. यलो गेट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढला असता, तो सुनिल पाचारचाच असल्याचे स्पष्ट झाले.
अपघात की घातपात?
सुनिल पाचारच्या मृत्यूबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. तो जहाजावरून अपघाताने पडला की, कोणीतरी त्याला ढकलले? त्याने आत्महत्या केली का? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे. मृतदेह पुढील तपासासाठी सेंट जॉर्ज रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.या घटनेने मर्चंट नेव्हीतील सुरक्षेच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे केले आहे. समुद्रात काम करणाऱ्या कर्मचार्यांसाठी आवश्यक सुरक्षा उपाय होते का? बेपत्ता झाल्यानंतर तत्काळ शोध मोहीम का राबवली नाही? या बाबींची चौकशी होणे आवश्यक आहे.पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला असून मृत्यू नक्की कसा झाला याची उलगडा शवविच्छेदन अहवाालानंतरच होणार आहे.
हेही वाचा:
























