Eknath Shinde Meets Liladhar Dake : एकनाथ शिंदे यांचा शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांकडे मोर्चा, लीलाधर डाके यांच्या भेटीसाठी पोहोचले
Eknath Shinde Meets Liladhar Dake : आता एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांकडे मोर्चा वळवलेला दिसत आहे. शिवसेनेत नेतेपद भूषवणारे लीलाधर डाके यांच्या भेटीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचले आहेत. तर संध्याकाळी ते माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांची भेट घेणार आहेत.
Eknath Shinde Meets Liladhar Dake : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्त्वाखाली 40 आमदारांनी बंडखोरी केली आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सोडावी लागली. त्यानंतर 12 खासदारांनीही एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देत गटात सामील झाले. आता एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांकडे मोर्चा वळवलेला दिसत आहे. शिवसेनेत नेतेपद भूषवणारे लीलाधर डाके (Liladhar Dake) यांच्या भेटीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचले आहेत. तर संध्याकाळी ते माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते मनोहर जोशी (Manohar Joshi) यांची भेट घेणार आहेत. यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे नेते आणि खासदार गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) यांची भेट घेतली होती. तर नेत्यांच्या यादीपैकी रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ हे आधीच शिंदे गटात सहभागी झाले आहेत.
एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट केल्यानंतर अनेक शिवसैनिक त्यांना समर्थन देताना पाहायला मिळत आहेत. तर दुसरीकडे शिवसेनेतील ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरु केल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे आज लिलाधर डाके यांच्या भेटीला पोहोचले आहेत. मुख्यमंत्र्यांसह स्थानिक आमदार मंगेश कुडाळकर देखील लीलाधर डाके यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत.
भेटीमागचं कारण काय?
बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात, त्यांच्या हाताखाली तयार झालेल्या ज्येष्ठ नेत्यांची भेट एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न आहे. आम्ही जुन्या जाणत्या नेत्यांना विसरलेलो नाही. त्यांच्या गाठीभेटी घेत त्यांची विचारपूस करत आहे हे दाखवण्याचा शिंदे यांचा प्रयत्न आहे. या माध्यमातून त्यांची मतं, पाठिंबा आपल्या बाजूने वळवण्याचा एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळेच लीलाधर डाके, मनोहर जोशी किंवा गजानन कीर्तिकर असतील यांच्या भेटीगाठी घेण्याचा सिलसिला त्यांनी सुरु केला आहे. वयोमानानुसार या ज्येष्ठ शिवसैनिकांच्या तब्येतीच्या कुरबुरी सुरु असतात. त्यामुळे सहानुभूतीपूर्वक त्यांची भेट घेणं मुख्यमंत्री म्हणून गरजेचं आहे, अशी भावना शिंदे गटाकडून व्यक्त केली जात आहे.
प्रतिकूल परिस्थितीत शिवसेना वाढवण्याचं काम डाके साहेबांनी केलं : एकनाथ शिंदे
या भेटीनंतर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, "शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आदरणीय लीलाधर डाके यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मी आज आलो होतो. ही सदिच्छा भेट होती. शिवसेना पक्ष वाढवण्यासाठी त्यांचं योगदान मी खूप जवळून पाहिलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचे सुरुवातीचे नेते होते त्यामध्ये डाके साहेबांचा समावेश होता. आनंद दिघे साहेब आणि डाके साहेब यांचे स्नेहाचे संबंध होते. प्रतिकूल परिस्थितीत शिवसेना वाढवण्याचं काम त्यांनी केलं. आताची जी शिवसेना पाहतो त्यात डाके साहेबांचं योगदान मोठं आहे. मंत्रिपद मिळून सुद्धा त्यांची राहणी अत्यंत साधी आहे. स्वत:साठी काही निर्माण केलं नाही, जे केलं ते शिवसेना या चार अक्षरांसाठी आणि बाळासाहेबांच्या विचारांसाठी. अशा नेत्यांमुळे, कार्यकर्त्यांमुळे बाळासाहेबांची शिवसेना पुढे गेलेली आहे. म्हणून ज्येष्ठ नेते डाके साहेबांना एक शिवसैनिक म्हणून भेटायला आलो."
'प्रत्येक ज्येष्ठ नेत्याचे आशीर्वाद घेणार'
संध्याकाळी मनोहर जोशी यांची भेट घेण्याबाबत एकनाथ शिंदे म्हणाले की, "शिवसेनेत योगदान दिलेल्या प्रत्येक ज्येष्ठ नेत्याची भेट घेणार आहे. राज्याचा मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रत्येकाचा आशीर्वाद घेणार आहे. कारण त्यांच्या गेल्या अनेक वर्षांच्या अनुभव उपयोग राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी, सर्वसामान्यांच्या हितासाठी करण्याचा प्रयत्न करणार आहे.