Clean Beach : गणेश विसर्जनानंतर समुद्र किनाऱ्यांच्या स्वच्छतेसाठी स्वयंसेवी संस्था सरसावल्या; सेलिब्रेटीही सहभागी
Clean Beach : गणेश विसर्जनानंतर मुंबईतील जुहू आणि वर्सोवा समुद्र किनाऱ्यावर आज स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.
Clean Beach : गणेश विसर्जनानंतर (Ganesh Immersion) समुद्र किनाऱ्यांच्या स्वच्छतेसाठी स्वयंसेवी संस्था, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते सरसावले आहेत. दिव्याज फाउंडेशनच्यावतीने गणेश विसर्जनानंतर जुहू येथे किनारा स्वच्छ अभियान राबवले गेले. या मोहिमेत राज्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री मंगल प्रभात लोढा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस, अभिनेते अनुपम खेर, अभिनेत्री परिणीती चोप्रा यांच्यासह भाजप नेते या कार्यक्रमाला उपस्थित होते. तर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनीदेखील दादर चौपाटीवर स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. यावेळी मनसे पदाधिकारीदेखील उपस्थित होते.
या वेळी बोलताना अभिनेते अनुपम खेर यांनी म्हटले की, मुंबई अनेकांना खूप देते. मलाही या शहराने खूप काही दिले आहे. मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी गेल्या दोन वर्षांत चांगलं काम केलं आहे. आता आपल्याला मुंबई स्वच्छ करायची असल्याचे खेर यांनी म्हटले. मुंबई स्वच्छ करायची असून त्यात सर्वांनी आनंदाने सहभागी व्हावे असे आवाहन परिणीती चोप्राने केले. अमृता फडणवीस यांनी म्हटले की, जेथे स्वच्छता असते तिथे देव असतो. आजच्या या स्वच्छता मोहिमेसाठी मोठ्या प्रमाणावर सगळेजण जमले आहेत, याचा आनंद वाटत आहे. आपण सगळेजण स्वच्छता मोहिमेत यशस्वी होऊ असेही त्यांनी म्हटले.
मनसेकडून वर्सोवा किनारा स्वच्छता मोहीम
गणपती विसर्जनानंतर शनिवारी सकाळी मुंबईतील विविध समुद्रकिनाऱ्यांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून स्वच्छता अभियान राबवण्यात आले. "आपला समुद्रकिनारा आपली जबाबदारी" असे म्हणत वर्सोवा विधानसभेचे मनसे विभाग अध्यक्ष संदेश देसाई यांच्या नेतृत्वाखाली सात बंगला-वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर जाऊन मनसैनिकांनी स्वच्छता अभियान राबवले. यावेळी मोठ्या प्रमाणात समुद्रात किनाऱ्यावर वाहून आलेले निर्माल्य आणि इतर कचरा जमा केला. यावेळी सफाई मोहिमेत शेकडो मनसैनिक आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी देखील सहभाग घेतला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी 'आपला समुद्र किनारा, आपली जबाबदारी' या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला. अनेक पर्यावरणप्रेमींसह अमित ठाकरे यांनी दादर समुद्र किनाऱ्यावर वाळूत रुतलेले गणेश मूर्तींचे अवशेष तसंच निर्माल्य उचलून हा किनारा स्वच्छ केला.
गणेश विसर्जनादरम्यान, मुंबई महापालिकेने मोठी व्यवस्था केली होती. समुद्राचे प्रदूषण कमी व्हावे यासाठी ठिकठिकाणी निर्माल्य गोळा करण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तर, अनेक ठिकाणी कृत्रिम तलाव उभारण्यात आले होते. या कृत्रिम तलावांमध्ये घरगुती गणपतींचे विसर्जन करण्यात आले.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- कोल्हापूर, नाशिक, साताऱ्यात विसर्जन मिरवणुकीत रात्री बारा वाजता डीजेचा दणदणाट बंद; पुण्यात 12नंतरही डीजे सुरु
- Ganesh Visarjan 2022 : गणेश विसर्जन घाटावर 11 जणांना विजेचा शॉक, जखमींमध्ये चिमुरड्यांचा समावेश, पनवेलमधील मोठी घटना