Ganesh Visarjan 2022 : गणेश विसर्जन घाटावर 11 जणांना विजेचा शॉक, जखमींमध्ये चिमुरड्यांचा समावेश, पनवेलमधील मोठी घटना
Ganesh Visarjan 2022 : या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली असून जखमींमध्ये चिमुरड्यांचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे.
Ganesh Visarjan 2022 : पनवेलमध्ये (Panvel) मोठी दुर्घटना घडली असून कोळीवाडा येथे गणेश विसर्जन घाटावरती जनरेटर मधील वायर तुटून तब्बल 11 गणेशभक्तांना विजेचा झटका बसला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली असून ही घटना काल रात्री 8 वाजेच्या सुमारास घडल्याचे समजते. जखमींमध्ये चिमुरड्यांचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे.
पनवेलमधील मोठी दुर्घटना
पनवेलमध्ये घडलेल्या दुर्घटनेत जखमी झालेल्या 11 जणांपैकी दोन रहिवासी गंभीर असून आठ रहिवाशांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर दोन जणांना लाईफलाईन हॉस्पिटल तर एक रहिवासी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजते. दरम्यान, जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तर 7 ते 8 रहिवाशांना आयसीयुमध्ये दाखल करण्यात आले...
जखमींची नावे
जखमींमध्ये हर्षद पनवेलकर (वय 32), मानस कुंभार (वय 17), रुपाली पनवेलकर (वय 35), रितेश पनवेलकर (वय 38), निहाल चोणकर (वय 5), सर्वेम पनवेलकर (वय 15), दिलीप पनवेलकर (वय 65), दिपाली पनवेलकर (वय 24), वेदांत कुंभार (वय 18), दर्शना शिवशिवकर (वय 36), तनिष्का पनवेलकर (वय 9 महिने) यांचा समावेश आहे.
पालिका प्रशासनाची वेळीच धावाधाव, भाविकांना दिले उपचार
पनवेलमध्ये आपल्या लाडक्या गणेशबाप्पांना निरोप देत असताना ही घटना घडली. घटना घडली तेव्हा महापालिकेचे कर्मचारी घटनास्थळी उपस्थित असल्याने पालिका प्रशासनाने धावाधाव करुन भावीकांना वेळीच उपचार दिले. तसेच गणेश विसर्जन शांततेत व सुरक्षेत पार पडावे यासाठी विसर्जन घाटांवर पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होती. मात्र घटना घडल्याचे कळताच पालिका अधिकारी, पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहचल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच माजी सभागृहनेते परेश ठाकूर, पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख, परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त भागवत सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने, माजी नगरसेविका दर्शना भोईर यांच्यासह सर्व पोलीस अधिकारी- कर्मचारी, महापालिकेचे उपायुक्त, सर्व अधिकारीवर्ग आदींनी रुग्णालयात धाव घेतली असून या घटनेचा पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.
जोरदार पावसामुळे घडली घटना
माहितीनुसार, पनवेलमधील वडघर कोळीवाडा येथील विसर्जन घाटावर गणेशभक्तांच्या सोयीसाठी जनरेटरची व्यवस्था करण्यात आली होती. घटना घडली तेव्हा जोरदार पाऊसही सुरु होता. त्यामुळे जनरेटरची एक वायर तुटून एका तरुणाच्या अंगावर पडली. यावेळी त्याला शॉक लागला. त्याला पाहून कुटुंबीयांनी मदत करण्यासाठी त्याला स्पर्श केला. या वेळी कुटुंबीयांनाही विजेचा धक्का बसला. असे सांगण्यात येत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या