मुंबईत Railway Platform Ticket दरात वाढ, 'या' स्थानकात मोजावे लागणार 10 ऐवजी 50 रुपये!
Railway Platform Ticket Rate : मध्य रेल्वेने मुंबईत रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट दरात वाढ केली आहे. तिकीट दर दहा रुपयांवरुन 50 रुपये झाले आहेत. ही दरवाढ आजपासून म्हणजेच 9 मे 2022 ते 23 मे 2022 पर्यंत असेल.
मुंबई : मध्य रेल्वेने मुंबईत रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट दरात वाढ केली आहे. आजपासून नवीन दर लागू करण्यात आले आहेत. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. वाढ केल्यानंतर तिकीट दर दहा रुपयांवरुन 50 रुपये झाले आहेत. त्यामुळे आता मुंबईतील सीएसएमटी, दादर, एलटीटी, ठाणे, कल्याण आणि पनवेल या रेल्वे स्थानकांत प्लॅटफॉर्म तिकीटांची किंमत 10 रुपयांऐवजी 50 रुपये इतकी असणार आहे.
ही दरवाढ आजपासून म्हणजेच 9 मे 2022 ते 23 मे 2022 पर्यंत असेल. याचाच अर्थ प्लॅटफॉर्म तिकीटाचे वाढीव दर सध्या तरी 15 दिवसांसाठीच करण्यात आली आहे.
प्लॅटफॉर्म तिकीट दरात वाढ करण्यामागे विशेष कारण आहे. एप्रिल महिन्यात मुंबईतील विविध रेल्वे स्थानक परिसरात अलार्म चेन पुलिंगच्या 332 घटना घडल्या. यामध्ये बऱ्याच जणांनी कोणतंही कारण नसताना रेल्वेची आपत्कालीन साखळी ओढली आहे. अशा गैरकृत्यांमुळे एप्रिल महिन्यात अनेक एक्स्प्रेस रेल्वे उशिरा धावल्या. शिवाय इतर प्रवाशांनाही नाहक त्रास सहन करावा लागला. ही बाब लक्षात घेऊन अलार्म चेन पुलिंगच्या घटना रोखण्यासाठी मध्य रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांच्या माहितीनुसार, एप्रिल महिन्यात अलार्म चेन पुलिंगच्या 332 घटना घडल्या. यापैकी 52 घटनांमागे खरंच आपत्कालीन कारण होतं. परंतु 279 वेळा काही कारणांशिवाय चेन पुलिंगच्या घटना घडल्या.
In order to control crowd and curb misuse of Alarm Chain pulling in summer season, it is proposed the price of platform tickets to be increased as a temporary measure frm Rs.10 to Rs. 50 at CSMT, Dadar, LTT, Thane, Kalyan & Panvel stations for 15 days from 9/5/2022 to 23/5/2022. pic.twitter.com/aKwookd41y
— Shivaji M Sutar (@ShivajiIRTS) May 8, 2022
चेन पुलिंगच्या या घटनांमुळे पोलिसांनी संबंधित लोकांवर गुन्हा दाखल केला आहे. भारतीय रेल्वे कायद्याअंतर्गत त्यांच्यावर कारवाई सुरु आहे. काही अज्ञातांवर गुन्हा दाखल करावे लागले. आतापर्यंत ही चूक करणाऱ्यांकडून 94 हजार रुपये दंड म्हणून वसूल करण्यात आले आहेत. प्लॅटफॉर्म तिकीट दरवाढीमुळे स्टेशनवर उगाचच येणाऱ्यांची संख्या घटेल, असा विश्वास रेल्वेला आहे. यामुळे सीएसएमी, दादर, एलटीटी, ठाणे, कल्याण आणि पनवेल या स्थानकांवर मुंबईकरांना आता दहाऐवजी 50 रुपये द्यावे लागणार आहेत.