Thackeray Group Office : वांद्रे पूर्वमधील ठाकरे गटाच्या अनधिकृत कार्यालयावर बीएमसीची कारवाई, बांधकाम पाडलं
Mumbai News : मुंबईतील ठाकरे गटाच्या अनधिकृत कार्यालयावर महापालिकेने कारवाई केली आहे. वांद्रे पूर्व भागात मोकळ्या जागेत शिवसेना ठाकरे गटाकडून अनधिकृत पद्धतीने बांधकाम करण्यात आलं होतं.
Mumbai News : मुंबईतील ठाकरे गटाच्या (Thackeray Group) अनधिकृत कार्यालयावर महापालिकेने कारवाई केली आहे. वांद्रे (Bandra) पूर्व भागात मोकळ्या जागेत शिवसेना ठाकरे गटाकडून अनधिकृत पद्धतीने बांधकाम करण्यात आलं होतं. ते बांधकाम आज मुंबई महापालिकेकडून (Mumbai Municipal Croporation) पाडण्यात येत आहे. कोणतीही परवानगी न घेता अनेक दिवसांपासून ठाकरे गटाकडून तिथे बोर्ड लावण्यात आले होते, शिवाय कार्यालय तयार करण्यात आलं होतं. त्यावर आज मुंबई महापालिकेने कारवाई केली आहे.
वांद्रे पूर्व रेल्वे स्टेशनच्या बाहेर मोकळ्या जागेवर ठाकरे गटाकडून अनधिकृत कार्यालय बांधण्यात आलं होतं. तसंच काही होर्डिंग्जही लावण्यात आले होते. मुंबई महापालिकेकडून ज्या पद्धतीने तोडक कारवाई करण्यात येते, तशीच कारवाई आज करण्यात आली. यावेळी ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते याला विरोध करत होते. परंतु हे बांधकाम करताना ठाकरे गटाकडून मुंबई महापालिकेची पूर्वपरवानगी घेण्यात आली नव्हती. सोबतच बीएमसीला विचारणा देखील करण्यात आली नव्हती. त्यामुळेच अनधिकृत बांधकाम पाडत असल्याचं मुंबई महापालिकेकडून पदाधिकारी आणि माध्यमांना सांगण्यात आलं. महापालिकेकडे या कार्यालयाची अधिकृत कागदपत्रे नव्हती, नोंद नव्हती असं बीएमसीकडून सांगण्यात आलं.
पाडकाम सुरु असताना काही काळ तणावाचं वातावरण होतं. मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाकडून पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात येत आहे.
शाखेवरील कारवाई हे वैरभावनेचे द्योतक : अरविंद सावंत
"महापालिकेने केलेली कारवाई अन्यायकारक आहे. हे कार्यालय पोलीस स्टेशनच्या समोर आहे. काल बांधलेलं नाही. कागदपत्रे सादर करण्यासाठी नोटीस द्यायला हवी होती, पण एकाएकी तोडफोड? हे वैरभावनेचे द्योतक आहे," अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी दिली. "हे कार्यालय जवळपास 40-50 वर्ष जुनं आहे. एकीकडे आपण झोपड्यांना अधिकृत करत आहोत. मात्र वांद्रे पश्चिमेकडील झोपड्यांना हात लावण्याची हिंमत नसलेलं हे सरकार आहे. त्यांचं एलआयसीसमोरलं कार्यालय सुद्धा अनधिकृत आहे. हे कार्यालय वांद्रे पूर्वमधील शाखेपेक्षा नवीन आहे. ते तोडण्याची हिंमत असेल तर तिथेही करा. इतक्या नीच पद्धतीने आपण कुठल्या थराला महाराष्ट्र, देश आणि वैर घेऊन जात आहोत याचा निषेध करायला शब्द नाही. क्रूरकर्मा ज्यापद्धतीने काम करतो तसं हे सरकार काम करत आहे. ही जनसेवेची केंद्रे आहेत. भाजपचं कार्यालय आधुनिक, वातानुकूलित कार्यालय आहे. आमची कार्यलये झोपड्यांसारखी आहेत. गोरगरिबांना सेवा देणारी कार्यालयं आहेत," असं अरविंद सावंत म्हणाले.