Mumbai Diwali : मुंबईत दिवाळी फटाक्यांशिवाय साजरी करा; पालकमंत्री केसरकर यांचे आवाहन
Firecracker Diwali Mumbai : मुंबईत सुद्धा फटाके न वाजवत दिवाळी साजरी करावी असे आवाहन पालकमंत्री म्हणून करत असल्याचे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आणि मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी म्हटले.
मुंबई : दिवाळीत मुंबईतील हवा प्रदूषणाच्या (Mumbai Air Pollution) मुद्यावर चिंता व्यक्त केली असताना दुसरीकडे आता राज्य सरकारने मुंबईकरांना फटाकेमुक्त दिवाळी (Firecracker Free Diwali) साजरी करण्याचे आवाहन केले आहे. फटाके न वाजविण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केला आहे. मुंबईत सुद्धा फटाके न वाजवत दिवाळी साजरी करावी असे आवाहन पालकमंत्री म्हणून करत असल्याचे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आणि मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी म्हटले.
दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, मुंबई पोलीस आयुक्तांसोबत चर्चा केली आहे. फटाके न वाजवण्याबाबत सक्तीचे आदेश नाहीत. पण फटाके वाजवू नये असे आमचे आवाहन असल्याचेही त्यांनी म्हटले.
फराळ विक्रेत्यांना दिलासा...
दिवाळीत पदपथावर फराळ विक्री केली जाते. त्यासाठी स्टॉल टाकले जातात. त्यांच्यासाठी पाडव्यापर्यंत त्यांना स्टॉल लावून फराळ-पदार्थ विक्री करता येईल. त्यांना आम्ही परवानगी दिली असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. पाडाव्या नंतर या फराळ विक्रेत्यांनी आपले स्टॉल रस्त्यावरुन काढून टाकावे, अशी सूचना ही दीपक केसरकर यांनी केली.
प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू...
हवा प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध भागात पाणी मारण्याचे काम ठिकठिकाणी सुरू आहे. अनेक ठिकाणी जिथे बांधकाम सुरू आहे तिथे नियमांचा उल्लंघन करण्यावर कारवाईची नोटीस दिली जात असल्याचे दीपक केसरकर यांनी म्हटले. नोटीस मिळाल्या किंवा नाही जिथे बांधकाम सुरू आहे तिथे त्यांच्यामुळे प्रदूषण होणार नाही याची जबाबदारी त्यांनी स्वतः घ्यावी असा इशाराही त्यांनी दिला. फटाक्यांचा वापर कमीत कमी करावा,जेणेकरुन मुंबईची हवा प्रदूषित होणार नाही असे आवाहनही त्यांनी केले आहे.
मुंबईतील रस्त्यांची कामे सुरू
मुंबई शहरात रस्त्यांची कामे सुरू झाली असल्याची माहिती पालक मंत्र्यांनी दिली. 25 यंत्रणांची परवानगी घेऊन ही कामे करावी लागतात. ज्यांनी कामे सुरू केली नाही त्यांच्यावर कारवाई होईल असेही त्यांनी म्हटले.
आदित्य ठाकरेंना टोला
शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांची सिद्धीविनायक मंदिर न्यासाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यावरून शिवेसना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी टीका केली. त्यावर बोलताना दीपक केसरकर यांनी
जेव्हा सदा सरवणकर तुमच्या सोबत असतात तेंव्हा योग्य असतात आणि दुसऱ्या सोबत गेल्यावर टीका करतात, असा सवाल केला. प्रभादेवीच्या सौंदर्यकरणासाठी 25 कोटी मंजूर केले, हे तुम्ही त्यांना दिले का? आम्ही जनतेसाठी काम करतो, असे सांगत सरवणकर सिद्धिविनायकचे भक्त आहे त्यांच्यावर गुन्हेगारी पार्श्वभूमीवर नसल्याचेही केसरकर यांनी म्हटले. सरवणकर यांच्या नियुक्तीवरून त्यांची पोट दुखी होत असेल तर त्यांच्यासाठी पाटणकर काढा असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.