बीएमसीकडून कोट्यवधींच्या मालमत्ता कराची वसुली थकीत; करबुडव्यांवर कारवाई होणार?
मुंबई महापालिकेचा 1600 कोटींचा मालमत्ता कर थकवणाऱ्या 50 करबुडव्यांची यादी एबीपी माझाच्या हाती लागली आहे. मुंबई महापालिकेचा कर बुडवणाऱ्या करबुडव्यांच्या यादीमध्ये म्हाडा, एमएमआरडीए आणि एसआरए सारख्या सरकारी कार्यालयांचाही समावेश आहे.
मुंबई : दरवर्षी मालमत्ता कर भरण्यास थोडासा जरी उशीर झाला तरी नागरिकांना नोटीसांवर नोटीसा देणाऱ्या मुंबई महानगरपालिकेनं बड्या करबुडव्यांवर कोणतीच कारवाई केलेली दिसत नाहीये. थोडा थोडका नव्हे तर तब्बल 1600 कोटींचा मालमत्ता कर थकवणाऱ्या 50 करबुडव्यांची यादी एबीपी माझाच्या हाती लागली आहे.
मुंबई महापालिकेचा कर बुडवणाऱ्या करबुडव्यांच्या यादीमध्ये म्हाडा, एमएमआरडीए आणि एसआरए सारख्या सरकारी कार्यालयांचाही समावेश आहे. तसेच हॉटेल ताज लँड एन्ड, मुंबई विमानतळ आणि काही बडी रुग्णालयं आणि बिल्डर्सचाही या यादीत समावेश आहे. त्यामुळे आता या करबुडव्यांकडून कर वसुल करण्यासाठी पालिका कारवाई करणार की, त्यांच्यावरील वरदहस्त कायम ठेवणार? हे पाहावं लागणार आहे.
कोरोनाच्या उपाययोजनांवर आतापर्यंत दोन हजार कोटींहून अधिक खर्च झाला आहे. अशातच मुंबई महापालिकेचा कोट्यावधींचा मालमत्ता कर थकलेला आहे. मुंबई महापालिकेचा सध्याचा सर्वात मोठा उत्पन्नाचा स्रोत म्हणजे, मालमत्ता कर. परंतु, या वसुलीसाठी प्रशासनाची यंत्रणा मात्र थंड पडल्याचं पहायला मिळत आहे. प्रशासन बड्या धेंडांना मालमत्ता करात सवलत देतानाच, अशा मोठ्या धेंडांकडे असलेली कराची वसुली करण्याबाबत गंभीर नसल्याचे पहायला मिळत आहे.
पालिकेचे थकबाकीदार :
एच पूर्व विभाग : फॉर्च्युन 2000 इमारती 164 कोटी ए विभागातील : ईश्वसय्या रिसर्च व डेव्हलपमेंट सेंटर 141 कोटी म्हाडा मुंबई गोरेगाव रिजन 4 : 75 कोटी एचडीआयएल : 55 कोटी सेव्हन हिल रुग्णालय : 51 कोटी एमएमआरडीए : 49 कोटी सुमेर असोसिएसट : 37 कोटी जवाला रियल इस्टेस्ट : 47 कोटी रूणवाल प्रोजेक्ट्स : 29 कोटी शिवकृपा : 35 कोटी रघुवंशी मिल : 24 कोटी म्हाडा : सुमारे 150 कोटी रुपये एसआरए : 23 कोटी हॉटेल ताज लँड एन्ड, वांद्रे : 35 कोटी रुपये बिच रिसॉर्ट : 22 कोटी रुपये बॉम्बे क्रिकेट असोशिएशन : 34 कोटी रुपये वरळी वल्लभभाई स्टेडियम : 28 कोटी रुपये मुंबई विमानतळ : 25 कोटी रुपये