Covid 19 Mumbai Management Policy : मुंबई तू जिंकणार! महानगरपालिकेच्या कोविड व्यवस्थापनाचं नीती आयोगाकडून कौतुक
सर्वोच्च न्यायालय, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आता नीती आयोगानंही मुंबई महानगरपालिकेवर स्तुतीसमनं उधळली आहेत.
मुंबई : सर्वोच्च न्यायालय, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आता नीती आयोगानंही मुंबई महानगरपालिकेवर स्तुतीसमनं उधळली आहेत. मुंबईचं कोविड व्यवस्थापन हे प्रेरणादायी असल्याचं ट्विट नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं विशेष कौतुक केलं आहे.
सुरुवातीपासूनच मुंबईतील कोविड व्यवस्थापन हे तीन मुख्य निकषांवर आधारलेलं होतं. टेस्टिंग, ट्रीटींग आणि ट्रेसिंग हे ते तीन मुख्य निकष. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई महापालिकेकडे अद्यापही ऑक्सिजनची कमतरता भासलेली नाही, त्यामुळं यापूर्वीच ऑक्सिजन मॅनेजमेंट यंत्रणेचंही मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात आलं आहे.
बेड अलॉटमेंट सिस्टीमचा पर्याय मुंबई महापालिकेने सर्वप्रथम उपलब्ध करुन दिला. विकेंद्रीत पद्धतीने ही सेवा उपलब्ध करुन देण्यात आली होती. ज्याचाच अर्थ वॉर्डनिहाय सेवेला प्राधान्य देण्यात आलं होतं. ज्यामुळं प्रत्येक दिवसाला बेड्सचे काऊंट पालिकेच्या डॅशबोर्डवर आणि थेट मुंबईकरांनाही दिसत होते. यासोबत रुग्णसंख्या, मृतांची संख्या, सक्रिय रुग्णसंख्या अशी संपूर्ण आकडेवारी पारदर्शकरित्या मांडत असल्याचं पालिकेकडून स्पष्ट करण्यात आलं.
Coronavirus in Mumbai : शाब्बास मुंबई! मागील 45 दिवसांत मुंबईत पहिल्यांदाच रुग्णसंख्या 2500हून कमी
नीती आयोगानं याच व्यवस्थापनासाठी पालिकेची पाठ थोपटली असून, बेड अलॉटमेंट व्यवस्थेला अधोरेखित केलं आहे. लसीकरणाच्या बाबतीत मुंबई महानगरपालिकेने काही नवे नियम लागू केले आहेत. यामध्ये वॉक इन लसीकरण थांबवण्यात आलं आहे. पण, ज्येष्ठ नागरिक, फ्रंटलाईन वर्कर्स यांना मात्र या सुविधेचा लाभ घेता येणार आहे ज्यामुळं लसीकरणाचा वेग फारसा कमी झालेला नाही. याशिवाय कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेमध्ये लहान मुलांना असणारा धोका पाहता, त्यासाठीही मालाड, गोरेगाव, सायन, मुलूंड या भागांमध्ये कोरोना संसर्गाशी लढण्यासाठी विशेष तयारी करण्यात येत आहे. त्यामुळं मुंबई महापालिकेकडून सातत्यानं परिस्थितीनुरुप उचलली जाणारी ही पावलं आणि सातत्यानं बाळगली जाणारी सावधगिरी पाहता नीती आयोगानं हे कौतुक केलं आहे.