'मुंबईकडून काहीतरी शिका' दिल्लीच्या ऑक्सिजन तुटवड्यावरुन सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला, BMCचं केलं कौतुक
मुंबई महापालिकेकडून आपण काही शिकू शकता का? असा सवाल न्यायालयाने केंद्र सरकारला विचारला आहे. दिल्लीला होत असलेल्या ऑक्सिजन तुटवड्यावरुन सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारवर जोरदार ताशेरे ओढले आहेत
नवी दिल्ली : मुंबई महापालिकेकडून आपण काही शिकू शकता का? असा सवाल न्यायालयाने केंद्र सरकारला विचारला आहे. दिल्लीला होत असलेल्या ऑक्सिजन तुटवड्यावरुन सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारवर जोरदार ताशेरे ओढले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेचे कौतुक करत केंद्र सरकारला सल्ला दिला. तसेच, मुंबई महापालिकेकडून आपण काही शिकू शकता का? असा सवालही न्यायालयाने केंद्र सरकारला विचारला.
सर्वोच्च न्यायालय म्हणाले, मागच्या वेळी मुंबई महापालिकेने ऑक्सिजन पुरवठा आणि वितरणाबाबत चांगले काम केले होते. आपण त्यांच्याकडून काही शिकू शकतो काय? दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिल्ली राज्याला ऑक्सिजन पुरवठा आवश्यक प्रमाणात न केल्याबाबत कारणे दाखवा नोटीस जारी केली होती. याच नोटिशीला केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. केंद्र सरकारच्या याचिकेवर सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर त्याचे पालन व्हायला हवे. अधिकाऱ्यांना तुरुंगात पाठवून दिल्ली राज्याला ऑक्सिजन मिळणार नाही, असेही सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला सुनावले.
केंद्र सरकारने मुंबईकडे ऑक्सिजन मॅनेजमेंट मॉडेल मागितले आहे. जेणेकरुन ते राजधानी दिल्लीसह देशातील इतर राज्यांनाही लागू केले जाऊ शकेल. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, आमच्याकडे बफर स्टॉक बनविण्यासाठी आम्ही सूचवले होते. जर मुंबईमध्ये असे केले जाऊ शकते जिथे अधिक लोकसंख्या आहे. तर निश्चितच ते दिल्लीतही केले जाऊ शकते.
सर्वोच्च न्यायालयानं मुंबईचं कौतुक का केलं??
- एमएमआरडीएच्या सहकार्यानं फिल्ड हॉस्पिटल्स, जम्बो कोविड सेंटर उभी केली त्यामुळे इतर रुग्णालयांवरचा भार कमी झाला...
- गेल्या लॉकडाऊनचा अनुभव लक्षात घेऊन या लॉकडाऊनमध्ये मायक्रो प्लानिंग केले
- अत्यावश्यक गोष्टी--विशेषत:ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर चा तुटवडा होणार नाही याकडे मुंबई महापालिकेनं लक्ष दिले
- टेस्ट वाढवण्यावर भर देण्यात आला...गर्दीच्या ठिकाणी-जसे, मार्केट, मॉल, रेल्वे स्टेशन येथे टेस्टिंग कॅम्प सुरु केले
- पॉझिटीव्हिटी रेट कमी करण्यावर भर,संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन केल्यावर पॉझिटीव्हीटी रेट घसरला
- डेथ रेट गेल्या पहिल्या लाटेच्या तुलनेत कमी झाला
- बेड मॅनेजमेंट मॉडेल तयार केले...वॉर्डस्तरावर बेड वाटप केले...यासाठी वॉर्ड वॉर रुम कार्यरत करण्यात आले...
- बेड उगाच अडवले जाऊ नयेत यासाठी रुग्णाच्या आजाराच्या तीव्रतेप्रमाणे बेडस् चं योग्य नियोजन करण्यात आलं...
- खाजगी रुग्णालयातील बेडस् बेडस् चं वाटपही वॉर्ड रुमच्या मार्फत केलं गेलं
- लसीकरणासाठी यंत्रणेची उभारणी केली...खाजगी हॉस्पिटल्समध्ये देखिल सुविधांचा, क्षमतांचा आढावा घेऊन लसीकरणाची परवानगी दिली