Aaditya Thackeray यांच्या संकल्पनेतील शिवाजी पार्कच्या प्रकल्पात बदल करण्याचा मुंबई महापालिकेचा निर्णय
Mumbai News : शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतील शिवाजी पार्कच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात बदल करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे.
Mumbai News : राज्याचे माजी पर्यावरण मंत्री आणि शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या संकल्पनेतील शिवाजी पार्कच्या (Shivaji Park) महत्त्वाकांक्षी प्रकल्पात बदल करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने (Mumbai Municipal Corporation) घेतला आहे. आदित्य ठाकरेंच्या विश्वासातील महापालिकेतील अधिकाऱ्याच्या बदलीनंतर ठाकरेंच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमध्ये बदल करण्यात येत आहेत.
शिवाजी पार्क मैदानावरील मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या धुळीच्या प्रदुषणाला रोखण्यासाठी आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून शिवाजी पार्क मैदानाचा प्रकल्प तयार करण्यात आला. यात शिवाजी पार्कच्या नुतनीकरणावरही भर देण्यात आला होता. मात्र, या प्रकल्पातील पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होत आले असताना धुळीच्या प्रदूषणाची समस्या कमी न होता अधिक वाढल्याच्या तक्रारी रहिवाशांकडून करण्यात आल्या. या पार्श्वभूमीवर आता शिवाजी पार्क प्रकल्पाच्या सध्याच्या कामात काही महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
हे बदल करण्याकरता पुन्हा एकदा रहिवाशांकडून सूचना आणि हरकती मागवण्यात आल्या आहेत. तसेच, प्रकल्पाकरता असलेल्या कोअर कमिटीची व्याप्तीही वाढवण्यात येणार आहे. मात्र, या प्रकल्पाला स्थगिती देण्याचा विचार नाही. रहिवाशांच्या तक्रारी लक्षात घेऊन काही बदल केले जातील, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.
शिवाजी पार्कमधील प्रकल्प आणि वाद
शिवाजी पार्कवर करण्यात आलेल्या 'रेनवॉटर हार्वेस्टिंग' प्रकल्पावरून मागील काही वर्षांपासून अनेक वादविवाद निर्माण झाले होते. 2014 साली या ठिकाणी सुमारे 50 लाखांचा निधी वापरुन प्रकल्प सुरु करण्यात आला होता. मात्र, यात अनेक त्रुटी आणि अनियमितता असल्याचा आरोप करत 2021 मध्ये हा प्रकल्प बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर माजी मंत्री आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून शिवाजी पार्कचे सुशोभीकरण, 'रेनवॉटर हार्वेस्टिंग' आणि इतर कामांसाठी कोट्यवधींच्या निविदा पास करुन हे काम केलं जात आहे. मैदानात मोठ्या प्रमाणात धूळ उडत असल्याने त्याचा त्रास मैदान परिसरातील रहिवाशांना होत असल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यावर पर्याय म्हणून धूळ उडणे थांबवण्यासह मैदानात हिरवळ फुलवण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प पालिकेने उभारला. पावसाचे पाणी साठवण्यासाठी मैदानात विविध ठिकाणी 36 विहिरी बांधण्यात आल्या आहेत. मात्र विहिरींमध्ये पाणी जाण्याच्या मार्गाला व्यवस्थित उतार न मिळाल्याने तसेच सदोष पाईपलाईनमुळे पाणी विहिरींपर्यंत जाण्यास अडथळे निर्माण होत असल्याचं आढळून आल्याचा दावा इथल्या रहिवाशांनी केला आहे.
संबंधित बातम्या