Corona Testing Kit : मुंबई महापालिका कोरोना टेस्टिंग किट संदर्भात लवकरच नियमावली जारी करणार
Corona Testing Kit : मेडिकल दुकान मालकांना कोरोना सेल्फ टेस्टिंग किटचे रेकॉर्ड ठेवण्याबाबत मुंबई महापालिका सूचना देणार असल्याची माहिती आहे.
मुंबई : शहरात गेल्या काही दिवसांपासून सेल्फ कोरोना टेस्टच्या माध्यमातून घराच्या घरी चाचण्या करण्याचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये बाधित आल्यानंतरही काही जण पालिकेला माहिती कळवत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येमध्ये लपवाछपवी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता मुंबई महापालिका कोरोना टेस्टिंग किट संदर्भात लवकरच नियमावली जारी करणार आहे. कोरोना खबरदारीचे नियम पाळले जावेत आणि कोरोना रुग्ण संख्येत पारदर्शकता यावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोना टेस्टचे सेल्फ किट विकणार्या मेडिकल दुकान मालकांना यापुढे सेल्फ किटचे रेकॉर्ड ठेवणे बंधनकारक करण्यात येणार असल्याची माहिती बीएमसीकडून देण्यात आली आहे. याबाबत लवकरच नियमावली जाहीर करण्यात येणार आहे, असे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले आहे.
सर्व टेस्टिंग किट ज्या मॅन्युफॅक्चररकडून मुंबईतील मेडिकल दुकानांमध्ये जातात त्या मेडिकल दुकान मालकांना दुकानातून किती टेस्टिंग किट विक्री केले जात आहेत, किती जणांनी टेस्टिंग किट वापरले, किती जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आणि किती निगेटिव्ह आले याचा तपशील सुद्धा ठेवावा लागणार आहे. जेणेकरून ज्यांनी सेल्फ टेस्टिंग किटद्वारे कोरोना चाचणी केली आहे त्यांच्या अहवालाची माहिती प्रशासनापर्यंत पारदर्शकपणे पोहोचेल.
मुंबईत सद्यस्थितीत साधारणपणे दिवसाला अडीच ते तीन हजार या दरम्यान सेल्फ टेस्टिंग किटद्वारे कोरोना चाचणी होते. बीएमसी प्रशासन अधिकाऱ्यांशी चर्चा करून एक-दोन दिवसात अंतिम नियमावली जारी करणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- Maharashtra Corona Update : राज्यात मंगळवारी 34,424 रुग्णांची नोंद, तर 22 जणांचा मृत्यू
- Mumbai Corona Update : मुंबईत नवे 11 हजार 647 कोरोनाबाधित, दोन रुग्णांचा मृत्यू
- दिवसाला विना मास्क फिरणाऱ्या 100 जणांवर कारवाई करा; पोलीस आयुक्तांचे मुंबई पोलिसांना टार्गेट
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha