विनामास्क लोकांवर मुंबई महापालिकेची रेकॉर्डब्रेक कारवाई! एकाच दिवसांत 32 लाखांहून अधिकची दंड वसुली
मुंबई महापालिकेची 16 हजार 154 व्यक्तिंवर कारवाई. गेल्या काही दिवसांत एकाच दिवसात करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान करण्यात आलेली ही लक्षणीय कारवाई आहे.
मुंबई : 'कोविड 19' बाधितांची संख्या गेल्या काही दिवसांत वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ‘विना मास्क’ आढळून येणाऱ्या नागरिकांवर करण्यात येणारी दंडात्मक कारवाई अधिक प्रभावीपणे व अधिक व्यापकतेने करण्याचे निर्देश आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिले होते. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्या मार्गदर्शनात शनिवार महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात धडक कारवाई करण्यात आली.
या कारवाई दरम्यान रेस्टॉरंट, क्लब, जिमखाना, चित्रपटगृह इत्यादींमध्ये देखील धडक कारवाई करण्यात येऊन कोविड विषयक प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यानुसार 16 हजार 154 व्यक्तिंवर ‘विना मास्क’ विषयक कारवाई करण्यात येऊन प्रत्येकी रुपये 200 यानुसार एकूण रुपये 32 लाख 30 हजार 800 एवढी दंड वसुली करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांत एकाच दिवसात करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान करण्यात आलेली ही लक्षणीय कारवाई आहे.
'कोविड 19' च्या पार्श्वभूमीवर राज्यशासनाद्वारे देण्यात आलेल्या निर्देशांनुसार सार्वजनिक ठिकाणी, गर्दीच्या ठिकाणी वावरताना प्रत्येकाने आपल्या चेहऱ्यावर 'मास्क' लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच 'मास्क'चा वापर न करणा-या नागरिकांवर रुपये 200 एवढी दंड आकारणी करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.
बृहन्मुंबई महापालिकेद्वारे नागरिकांनी 'फेस-मास्क' वापरावा, यासाठी सातत्याने जनजागृती करण्यात येत आहे. यानंतरही 'मास्क' वापरणे टाळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. जनजागृती व दंडात्मक कारवाई या दोन्ही बाबींमुळे सकारात्मक परिणाम साधला जाऊन व नागरिकांमध्ये प्रभावी जनजागृती साध्य होत आहे. परिणामी, कोविड 19 ला आळा घालण्यासही मदत होत आहे. या अनुषंगाने नागरिकांनी घराबाहेर पडताना आवर्जून 'फेस-मास्क' घालूनच बाहेर पडावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाद्वारे पुन्हा एकदा करण्यात येत आहे.