(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai Local Trains : ..तर उद्यापासून मुंबई लोकलचे दरवाजे महिलांसाठी खुले!
नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर सर्व महिलांना लोकल मधून प्रवास करु देण्याची विनंती राज्याने रेल्वेकडे केली आहे.राज्य सरकारने विनंती केली असली, तरी रेल्वे बोर्ड महिला प्रवाश्यांना परवानगी देईल का?
मुंबई : घटस्थापनेचा मुहूर्त साधत राज्य सरकारने सर्व महिला प्रवाशांना लोकलने प्रवास करून द्यावा अशी विनंती रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. मात्र, रेल्वे प्रशासनाकडून याबाबत कोणती प्रतिक्रिया आलेली नसून, ज्यावेळी रेल्वे बोर्ड या विनंतीला मंजुरी देईल त्याच वेळी अधिकृत रित्या रेल्वेमध्ये महिलांना प्रवास करता येईल असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे महिलांना सतरा तारखेपासून लोकलने प्रवास करता येईल की नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून सर्वसामान्य प्रवाशांना देखील लोकलने प्रवास करू देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. आदित्य ठाकरे यांनी सांगितलेली 15 ऑक्टोबरची तारीख उलटून गेली असली तरी राज्य सरकारकडून काही हालचाली झालेल्या दिसून आलेल्या नाहीत. त्यामुळे आंदोलनाच्या पवित्र्यात असलेल्या रेल्वे प्रवाशांना थोडासा दिलासा मिळावा यासाठी आज राज्य सरकारने रेल्वेकडे एक विनंती पत्र पाठवले गेले. या पत्राद्वारे अत्यावश्यक सेवेत नसलेल्या महिलांनादेखील लोकलने प्रवास करू द्यावा अशी विनंती करण्यात आली. सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत तसेच संध्याकाळी 7 वाजल्या पासून ते शेवटच्या लोकल पर्यंत अशा मर्यादित वेळेत महिलांना लोकल प्रवास करू द्यावा असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यासाठी क्यूआर कोडची देखील आवश्यकता नाही असेही पत्रात म्हटले आहे. हे पत्र प्रसारमाध्यमांमध्ये आल्यानंतर सर्वत्र महिलांनी आनंद व्यक्त केला. मात्र राज्य सरकार केवळ विनंती करत असून अंतिम निर्णय रेल्वे बोर्डाच्या हातात आहे असे नंतर रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.
राज्य सरकारने दिलेले विनंती पत्र मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी रेल्वे बोर्डाकडे परवानगीसाठी पाठवले आहे. सध्या सुरू असलेल्या अत्यावश्यक सेवेतील विशेष लोकल, त्यात असलेली एकूण प्रवाशांची संख्या, स्थानकांवरील सोयीसुविधा अशा सर्व गोष्टी रेल्वे बोर्ड तपासेल. जर महिला प्रवाशांना परवानगी दिली तर अशा एकुण प्रवाशांची संख्या किती, याचा नेमका आकडा सध्या उपलब्ध नाही, त्यामुळे अतिरिक्त लोकल चालवाव्या लागतील, स्थानकावरील सोयीसुविधा वाढवाव्या लागतील, सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळून लोकलमध्ये महिलांना प्रवेश द्यायचा निर्णय घेण्यात येईल. अशा सर्व बाबींवर विचारविनिमय करून मगच रेल्वे बोर्ड अंतिम निर्णय घेईल. मात्र हा निर्णय रेल्वे बोर्ड आज लगेच घेऊन महिलांना परवानगी देईल याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे उद्यापासून महिलांना लोकलमध्ये प्रवास करता येईल की नाही याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जर रेल्वे बोर्डाने महाराष्ट्र सरकारच्या विनंतीला ताबडतोब प्रतिसाद दिला तरच उद्यापासून लोकलमध्ये सर्व महिलांना प्रवास करता येईल. त्यामुळे राज्य सरकारने जरी विनंती केली असली तरी हा निर्णय सर्वस्वी रेल्वे बोर्डाच्या हातात आहे असे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.
Mumbai Local | स्पेशल रिपोर्ट | मुंबईकरांना लोकल प्रवासासाठी आणखी वाट पाहावी लागणार? | ABP Majha