PSI Exam : लोकल विस्कळीत झाल्याचा 'पोलिस' परीक्षार्थींना फटका, पाच-दहा मिनिटं उशीर झाल्यानं प्रवेश नाकारला
आज सकाळी 11 वाजता पोलीस डिपार्टमेंट अंतर्गत पीएसआय पदासाठी पूर्व परीक्षा आयोजित करण्यात आली होती. मात्र आज अचानक लोकलचा प्रॉब्लेम उद्भवल्यामुळे अनेक उमेदवार परीक्षेसाठी पोहोचू शकले नाहीत.
Mumbai Local Train News Updates : मुंबई माटुंगा स्टेशनजवळ झालेल्या रेल्वेच्या अपघातामुळे लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. काल पुद्दुचेरी एक्स्प्रेसनं गदग एक्स्प्रेसला धडक दिल्यानं पुद्दुचेरी एक्स्प्रेसचे तीन डबे घसरले. त्यामुळे फास्ट ट्रॅकवरील वाहतूक बंद करण्यात आली. त्याचा परिणाम लोकल आणि लांबपल्ल्याच्या सेवेवरही झालाय. याचा फटका सर्वसामान्य मुंबईकरांसह काही परीक्षार्थींना देखील बसलाय.
पोलीस विभागाअंतर्गत आज पीएसआय पदासाठी परीक्षा होती मात्र लोकल प्रॉब्लेममुळे अनेक उमेदवार वेळेत पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे या उमेदवारांना प्रवेश दिला जात नाही. आज सकाळी 11 वाजता पोलीस डिपार्टमेंट अंतर्गत पीएसआय पदासाठी पूर्व परीक्षा आयोजित करण्यात आली होती. मात्र आज अचानक लोकलचा प्रॉब्लेम उद्भवल्यामुळे अनेक उमेदवार परीक्षेसाठी पोहोचू शकले नाहीत. 15 ते 20 मिनिटे उशिरा आलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला गेला नाही.
तब्बल चार वर्षानंतर ही परीक्षा झाल्याची माहिती आहे आणि चार वर्षानंतर परीक्षा होऊन फक्त दहा ते पंधरा मिनिटे उशिरा आल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश दिला गेला नाही अशी विद्यार्थ्यांची तक्रार आहे.
आज बऱ्याच लोकल उशीरानं धावत आहेत तर काही ठप्प झाल्या आहेत. पोलिस विभागातील खात्याअंतर्गत परीक्षेसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना लोकलच्या खोळंब्यामुळं परीक्षा केंद्रावर पोहोचायला उशीर झाल्यानं त्यांना परीक्षेला बसू न दिल्याचा प्रकार समोर आला आहे. कित्येक पोलिस परीक्षार्थी परीक्षा केंद्राबाहेर उभे आहेत. यातील काहींना अवघ्या पाच मिनिटांचा तर काहींना दोन मिनिटांचा उशीर झाल्यानं परीक्षेला बसू दिलेलं नाही. हे सर्व परीक्षार्थी ठाणे, नवी मुंबई, पनवेल, कल्याणहून हे परीक्षार्थी पोहोचलेत. मात्र त्यांना एन्ट्री न मिळाल्यानं विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
काल रात्री ही घटना घडली होती तर परीक्षेबाबत कालच निर्णय घ्यायला हवा होता, असं काही परीक्षार्थींनी म्हटलं आहे.
एक्सप्रेस स्लो ट्रॅकवर वळवल्यानं स्लो गाड्यांचं वेळापत्रक कोलमडलं
एक्सप्रेस स्लो ट्रॅकवर वळवल्यानं स्लो गाड्यांचं वेळापत्रक देखील कोलमडलं आहे. फास्ट लोकल वाहतूक धीम्या गतीनं आहे. तर सीएसएमटी ते कल्याण फास्ट ट्रॅक सुरु व्हायला दुपारी 12 वाजणार असल्याची माहिती आहे. कल्याण ते सीएसएमटी फास्ट ट्रॅकवरील लोकल सुरु असून सरासरी दोन तास उशिराने गाड्या आहे. अनेक एक्सप्रेस देखील सरासरी दोन तासाने उशिराने धावत आहेत.
सिग्नल मिळत नसल्यानं अनेक गाड्या खोळंबल्या
महालक्ष्मी एक्सप्रेस दादरला सकाळी 7.15 वाजता पोहोचते मात्र ती सकाळी 8.55 वाजता पोहोचली आहे. ठाणे ते माटुंगा दरम्यान अनेक स्लो गाड्या रांगेत आहेत. सिग्नल मिळत नसल्यानं अनेक गाड्या खोळंबल्या आहेत. यामुळं मुंबईकरांची मोठी अडचण झाली आहे. अनेक जण स्टेशन टू स्टेशन पैदल वारी करत असल्याचं दिसून आलं आहे. पीक अव्हरमध्ये चाकरमान्यांना मोठ्या प्रवासा दरम्यान वेळ खर्ची घालावा लागणार असून सोबतच अनेक अडचणींचा सामना देखील करावा लागण्याची शक्यता आहे.