Mumbai Local : पश्चिम रेल्वेवर आठ नवीन एसी लोकलच्या फेऱ्या, सात गाड्या धीम्या मार्गावर धावणार
पश्चिम रेल्वेवर पहिल्यांदाच धीम्या मार्गावर एसी लोकल चालविण्यात येणार आहेत. या आधी पश्चिम मार्गावर केवळ जलद एसी लोकल चालविण्यात येत होत्या.
मुबंई : पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जे प्रवासी एसी लोकलने प्रवास करतात त्यांच्यासाठी आठ अधिक एसी लोकलच्या फेऱ्या पश्चिम रेल्वेने चालवण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम रेल्वेवर पहिल्यांदाच धीम्या मार्गावर एसी लोकल चालविण्यात येणार आहेत. या आधी पश्चिम मार्गावर केवळ जलद एसी लोकल चालविण्यात येत होत्या. पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, एकूण आठ एसी लोकलच्या फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. त्यापैकी सात फेऱ्या या धीम्या मार्गावर असतील तर एक फेरी जलद मार्गावर चालवली जाईल.
या निर्णयामुळे सध्या सुरु असलेल्या एसी लोकलच्या एकूण फेऱ्यांमध्ये वाढ होणार असून, आता पश्चिम रेल्वे बारा ऐवजी 20 एसी लोकलच्या फेऱ्या चालवणार आहे. एसी लोकलच्या या फेऱ्या वाढवण्यासाठी दोन साध्या लोकलच्या फेऱ्या रद्द कराव्या लागणार आहेत. या साध्या लोकलच्या फेऱ्या चर्चगेट आणि बांद्रा या स्थानकांच्या दरम्यान चालवण्यात येत होत्या. तर उर्वरित सहा लोकलच्या फेऱ्या सध्याच्या वेळापत्रकात सामावून घेण्यात येणार आहेत. याच महिन्याच्या 22 तारखेपासून वेळापत्रकात हा बदल करण्यात येणार आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वे सध्या चालू होत असलेल्या एकूण लोकलच्या फेऱ्या 1367 वरून 1373 होतील.
या एसी लोकलच्या आठ फेऱ्या पैकी चार लोकल डाऊन दिशेला तर चार लोकल अप दिशेला चालवण्यात येतील. अप दिशेला चालवण्यात येणाऱ्या लोकलपैकी, एक लोकल विरार ते चर्चगेट, दोन एसी लोकल बोरवली आणि चर्चगेट तर उर्वरित एक एसी लोकल गोरेगाव आणि चर्चगेट या स्थानकांच्या दरम्यान चालवण्यात येईल. डाऊन दिशेला चालवण्यात येणाऱ्या एसी लोकल पैकी, एक एसी लोकल चर्चगेट आणि नालासोपारा दरम्यान, दोन एसी लोकल चर्चगेट आणि बोरिवली दरम्यान, तर उर्वरित एक एसी लोकल चर्चगेट ते गोरेगाव दरम्यान चालवण्यात येणार आहे. सध्या पश्चिम रेल्वे कडे चार एसी लोकल उपलब्ध आहेत. दुसरीकडे मध्य रेल्वेकडे दोन एसी लोकल उपलब्ध असून, मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर दहा आणि ट्रान्स हार्बर मार्गावर सोळा लोकलच्या फेऱ्या सध्या चालवण्यात येत आहेत.
संबंधित बातम्या :