Mumbai Himalaya Bridge : सीएसएमटीजवळील हिमालय पादचारी पूल आजपासून प्रवाशांसाठी सुरु होणार
Mumbai Himalaya Bridge : 2019 मधील दुर्घटनेनंतर मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाजवळील हिमालय पादचारी पूल आजपासून (30 मार्च) सुरु होणार आहे.
![Mumbai Himalaya Bridge : सीएसएमटीजवळील हिमालय पादचारी पूल आजपासून प्रवाशांसाठी सुरु होणार Mumbai Himalaya Bridge Himalaya footover bridge near CSMT will open for passengers from today Mumbai Himalaya Bridge : सीएसएमटीजवळील हिमालय पादचारी पूल आजपासून प्रवाशांसाठी सुरु होणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/30/32c67c4c30adb24f90db8aa6c9f9655d168014964927083_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Mumbai Himalaya Bridge : 2019 मधील दुर्घटनेनंतर मुंबईतील (Mumbai) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानकाजवळील हिमालय पादचारी पूल (Foot Over Bridge) चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आजपासून (30 मार्च) सुरु होणार आहे. त्यामुळे सीएसएमटी स्थानकाजवळील भुयारी मार्गात होणारी गर्दी कमी होईल आणि रस्ता ओलांडण्याचा त्रासही दूर होणार आहे.
चार वर्षांपूर्वी मोठी दुर्घटना
14 मार्च 2019 रोजी हिमालय पादचारी पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत सात जणांना जीव गमवावा लागला होता. तर या दुर्घटनेत सात जण गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर मुंबई महापालिकेने (Mumbai Municipal Corporation) हा पूल पाडून पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेतला. या पुलाचा दररोज सुमारे 50 हजार पादचाऱ्यांना लाभ होणार आहे. पुलाच्या बांधकामासाठी सात कोटी रुपये खर्च आला असून पुलाची लांबी 33 मीटर आणि रुंदी 4.4 मीटर आहे.
पुलाच्या बांधकामासाठी स्टेनलेस स्टीलचा वापर
गेल्या तीन वर्षांपासून पुलाचे काम सुरु आहे. हा पूल कोसळल्यानंतर नव्याने बांधण्याच्या प्रक्रियेत अनेक अडथळे येत गेले. त्यात करोना प्रादुर्भावाची भर पडल्याने त्यास आणखी विलंब झाला. पूल बांधण्याबाबत पूल विभागाकडून आराखडा तयार करण्यात आला होता. मुंबईतील जुने पूल लोखंडापासून तयार करण्यात आले आहेत. मुंबईतील खाऱ्या हवेचा लोखंडावर परिणाम होत असल्याने ते अनेक वर्षांनंतर गंजत जातात. त्यामुळे पुलांची वारंवार देखभाल, दुरुस्ती करावी लागते. त्यामुळे नवीन आराखड्यानुसार हिमालय पादचारी पूल बांधण्यासाठी टिकाऊ स्टेनलेस स्टीलचा वापर करण्यात आला आहे. मजबूत आणि टिकाऊ पुलासाठी ओदिशा इथून स्टेनलेस स्टीलचे 120 टनचे 5 गर्डर वापरण्यात आले असून ते किमान 50 वर्षे टिकून राहतील, असंही अधिकाऱ्याने सांगितलं. दरम्यान, आजपासून हिमालय पादचारी पूल प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल, अशी माहिती पालिकेच्या रस्ते व पूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
सरकता जिना बसवण्यासाठी चार ते पाच महिने लागणार
हिमालय पुलाचे काम पूर्ण झाले असून सरकता जिना बसवण्याच्या कामाला चार ते पाच महिन्यांचा वेळ लागणार आहे. त्यामुळे प्रवासी आणि पादचाऱ्यांसाठी पूल सेवेत आणण्याचा निर्णय घेतला असून गुरुवार 30 मार्चपासून पूल प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल, असे मुंबई महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान, सरकत्या जिन्यामुळे ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला, दिव्यांगांना पुलापर्यंत जाणं सुलभ होईल.
हेही वाचा
सीएसएमटी पुलाचा ऑडिटर नीरज देसाईच्या जामीनाला विरोध, मुंबई पोलिसांचं प्रतिज्ञापत्र सादर
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)