Mumabi Tulsi Lake: आनंदाची बातमी! मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारा पहिला तलाव भरला
Mumbai News: तुळसी तलाव भरुन वाहू लागला. १८७९ मध्ये ४० लाख रुपये खर्चून बांधण्यात आला होता तुळसी तलाव. मुंबईला पाणीपुरवठा करणा-या तलावांपैकी सर्वात लहान तलाव
मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणा-या आणि बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातच असणा-या दोन तलावांपैकी महानगरपालिकेचा ‘तुळशी तलाव’ (Tulsi lake) आज सकाळी साडेआठ वाजता पूर्ण भरुन वाहू लागला आहे. गेल्या वर्षी देखील 20 जुलै 2023 रोजीच मध्यरात्री १.२८ वाजताच्या सुमारास हा तलाव (Mumbai Lake) भरुन वाहू लागला होता.
804.6 कोटी लीटर अर्थात 8046 दशलक्ष लीटर उपयुक्त जलधारण क्षमता असणारा हा तलाव वर्ष 2022 व वर्ष 2021 मध्ये दिनांक 16 जुलै रोजीच ओसंडून वाहू लागला होता. तर त्या आधीच्या वर्षी म्हणजेच वर्ष 2020 मध्ये दिनांक 27 जुलै रोजी तुळशी तलाव ओसंडून वाहू लागला होता.
बृहन्मुंबई महापालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांपैकी तुळशी तलाव हा सर्वात लहान तलाव असून यातून दररोज सरासरी 18 दशलक्ष लीटर (1.8 कोटी लीटर) एवढ्या पाण्याचा पुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसात या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरून वाहू लागला आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.
तुळशी तलावाबाबत महत्त्वाची माहिती संक्षिप्त स्वरुपात पुढीलप्रमाणे आहे
* बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयापासून साधारणपणे ३५ किलोमीटर (सुमारे २२ मैल) अंतरावर हा तलाव आहे.
* या कृत्रिम तलावाचे बांधकाम सन १८७९ मध्ये पूर्ण झाले.
* या तलावाच्या बांधकामासाठी सुमारे ४० लाख रुपये एवढा खर्च तेव्हा आला होता.
* या तलावाचे पाणलोट क्षेत्र हे सुमारे ६.७६ किलोमीटर असून तलाव पूर्ण भरलेला असल्यास पाण्याचे क्षेत्रफळ हे सुमारे १.३५ चौरस किलोमीटर एवढे असते.
* तलाव पूर्ण भरलेला असताना तलावाचा उपयुक्त पाणीसाठा हा ८०४.६ कोटी लीटर एवढा असतो. (८०४६ दशलक्ष लीटर)
* तुळशी तलाव पूर्ण भरून ओसंडून वाहणारे पाणी हे विहार तलावाला जाऊन मिळते.
मुंबईत पाणीकपात
यंदाच्या उन्हाळ्यात मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या बहुतांश तलावांनी तळ गाठला होता. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने 10 टक्के पाणी कपातीचा निर्णय घेतला होता. जून महिन्यात समाधानकारक पाऊस न पडल्यामुळे मुंबईकरांची पाण्याची चिंता कायम होती. जुलै महिन्यात अनेक दिवस मुसळधार पाऊस झाल्याने तलावांमधील पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबईतील पवई तलाव भरला होता. त्यानंतर आता तुळशी तलाव भरल्याने मुंबईकरांसाठी ही दिलासादायक बाब म्हणावी लागेल. येत्या काही दिवसांत पावसाचा जोर कायम राहिल्यास मुंबईला पाणीपुरवठा करणारे उर्वरित तलावही लवकरच भरतील, अशी आशा आहे. जेणेकरून मुंबईतील पाणी कपात रद्द होईल.
आणखी वाचा