Kalyan Dombivli Shivsena and MNS Yuti: कल्याण डोंबिवलीत शिवसेना शिंदे गटाचा भाजपला 'मनसे' कात्रजचा घाट; आता काँग्रेस नगरसेवकांच्या निर्णयानं भूवया उंचावल्या
भाजपला कात्रजचा घाट दाखवत शिंदेसेना कल्याण डोंबिवलीत आपला महापौर करण्यासाठी मनसेला सोबत घेतलं आहे. त्यामुळे भाजपला 50 नगरसेवक असूनही विरोधात बसावं लागणार असल्याचे जवळपास स्पष्ट होत आहे.

Kalyan Dombivli Shivsena and MNS Yuti: कल्याण–डोंबिवली महापालिकेवर सत्ता स्थापन करण्यासाठी 62 नगरसेवकांचा बहुमताचा आकडा गाठणे अत्यावश्यक आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाने मोठी खेळी करताना मनसेला सोबत घेतलं आहे. कल्याण–डोंबिवलीतील शिंदे गटाचे 53 नगरसेवकाच्या गटाची अधिकृत नोंदणी केली जाणार आहे. याआधीच गटस्थापनेसाठी बैठक पार पडली. या बैठकीला मनसेचे माजी आमदार राजू पाटील उपस्थित होते. त्यामुळे भाजपला कात्रजचा घाट दाखवत शिंदेसेना कल्याण डोंबिवलीत आपला महापौर करण्यासाठी मनसेला सोबत घेतलं आहे. त्यामुळे भाजपला 50 नगरसेवक असूनही विरोधात बसावं लागणार असल्याचे जवळपास स्पष्ट होत आहे.
काँग्रेसच्या दोन नगरसेवकांचा सुद्धा गट
दुसरीकडे, कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे दोन नगरसेवक निवडून आले आहेत. समिना शेख, कांचन कुलकर्णी या काँग्रेस पक्षातून निवडून आलेल्या नगरसेविका आहेत. या दोन्ही नगरसेविका कोकण भवनला जात गट स्थापन करणार आहेत. आम्ही स्वतंत्र आहोत आम्ही कुठल्याही पक्षासोबत जाणार नाहीत. आम्हाला विचारणा होत आहे. मात्र, आमचा निर्णय ठाम असल्याची माहिती कांचन कुलकर्णी यांनी दिली. कल्याण डोंबिवली मनपात शिंदे गटाकडे 53 तर भाजपकडे 50 नगरसेवकांचे संख्याबळ आहे. निवडणुकीत ठाकरे गटाचे 11 तर मनसेचे 5 नगरसेवक निवडून आले होते. मात्र निकालानंतर ठाकरे गटातील मधुर म्हात्रे आणि किर्ती ढोणे हे दोन नगरसेवक बेपत्ता झाल्याने चर्चांना उधाण आले. हे दोघे शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची जोरदार चर्चा रंगली.
ठाकरे गटाचे संख्याबळ 11 वरून 7 वर
ठाकरे गट कोकण विभागीय आयुक्तांकडे गट नोंदणीसाठी जात असताना आणखी दोन नगरसेवक गैरहजर राहिले. हे नगरसेवक मनसेच्या गोटात गेल्याचे सांगितले जात असून, त्यामुळे ठाकरे गटाचे संख्याबळ थेट 11 वरून 7 वर आले. विशेष म्हणजे मनसेत गेलेले हे दोन्ही नगरसेवक पूर्वी मनसेचे कार्यकर्ते होते. आम्ही ‘घरवापसी’ केली असल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. या सगळ्या घडामोडींचा थेट फायदा शिंदे गटाला होऊ शकतो. मनसेचे निवडून आलेले 5 आणि ठाकरे गटातून मनसेत गेलेले 2 असे एकूण 7 नगरसेवक शिंदे गटाला पाठिंबा देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या घडामोडींवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ठाकरे गटाच्या चिन्हावर निवडून येऊन नंतर मनसेत गेलेल्या नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “ते कुठेही गेलेले असोत, पक्षाची आणि निवडणुकीची आचारसंहिता पाळली नाही तर कारवाई होणारच,” असा इशारा त्यांनी दिला.
इतर महत्वाच्या बातम्या




















