Raj Thackeray : पावसामुळे मुलाखत घेणं शक्य नाही, पण याच ठिकाणी पुन्हा येईन; राज ठाकरेंचं गोरेगावकरांना आश्वासन
मुंबई आणि उपनगरात पावसाने हजेरी लावल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा गोरेगाव येथील मुलाखतीचा कार्यक्रम स्थगित करण्यात आला. दरम्यान लवकरच पुढील तारीख काढून या ठिकाणी मी मुलाखतीसाठी येईन असं त्यांनी सांगितलं.
मुंबई : दिंडोशी येथील सांस्कृतिक कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची (Raj Thackeray) मुलाखत घेणार होती. पंरतु पावसामुळे ही मुलाखत रद्द करण्यात आली. पाऊस असल्यानं मुलाखत घेणं शक्य नसल्याचं यावेळी राज ठाकरेंनी म्हटलं. मुंबईतील (Mumbai) गोरेगाव (Goregaon) परिसरात दिंडोशी येथे काही सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलाखत घेण्यात येणार होती. परंतु मुंबईसह उपनगरात देखील पावसाने हजेरी लावली. त्यामुळे ही मुलाखत घेणं शक्य नसल्याचं स्वत: राज ठाकरे यांनी सांगितलं.
मी याच ठिकाणी पुन्हा मुलाखतीसाठी येईन - राज ठाकरे
मुलाखत सुरु असताना व्यासपीठावर छप्पर असेल आणि तुमच्या नाही. त्यात पाऊस देखील पडतोय. अशा परिस्थितीमध्ये मी काही मुलाखत देऊ इच्छित नाही. मी त्यांना हे छप्पर काढत येईल का, असं देखील विचारलं. पण ते आता शक्य नाही. त्यामुळे आजची मुलाखत आपण स्थगित करु. पण याच महिन्याची पुढची तारीख निवडून इथे मुलाखतीसाठी येईन, असा माझा शब्द आहे. त्यावेळी मी तुमच्यासमोर राज्यातील राजकीय घडामोडींबाबत भाष्य करेन. पाऊस पडत असतानाही मी मुद्दाम तुमच्या समोर आलोय. कारण मला तुम्हाला भेटायचं होतं. पुढच्या मुलाखतीसाठी तुम्ही सगळ्यांनी यावं हे निमंत्रण मी आताच तुम्हाला देतोय, असं राज ठाकरेंनी म्हटलं.
'सरकार आणि पाऊस कधी येतील आणि कोसळतील सांगता येत नाही'
पावसामुळे राज ठाकरेंचा कार्यक्रम जरी रद्द झाला. पण तरीही या सगळ्यामध्ये राज ठाकरेंनी सरकारवर मिश्किल टीप्पणी देखील केली. पाऊस आणि सरकार कधी येतील आणि कोसळतील काही सांगता येत नाही, असं राज ठाकरे यांनी म्हटलं. त्यामुळे त्यांच्या कार्यक्रमात एकच हास्यकल्लोळ माजला. दरम्यान काहीच दिवसांत पुन्हा एकदा मुलाखतीसाठी येईल असं आश्वासन देखील राज ठाकरे यांनी यावेळी गोरेगावकरांना दिलं. त्यामुळे आता राज ठाकरे हे पुन्हा कधी गोरेगावमध्ये मुलाखतीसाठी जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.