Mumbai Goa Highway Rain: राज्यात पावसाचा हाहा:कार! मुंबई-गोवा महामार्ग ठप्प, मिसिंग लिंकवर दरड कोसळली, खोपोली-पेण महामार्ग पाण्याखाली
Mumbai Goa Highway Rain: परशुराम घाटात दरड कोसळण्याचा धोका, मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक धोकादायक

Mumbai Goa Highway Rain: गेल्या काही तासांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरुन प्रवास करणे अत्यंत धोकादायक झाले आहे. रविवारी मुंबई-गोवा महामार्गावर (Mumbai Goa Highway) नागोठणे परिसरात दरड कोसळली होती. यानंतर आता दुसऱ्या दिवशी सोमवारी परशुराम घाटात मोठी दरड कोसळण्याचा धोका आहे. परशुराम घाटाच्या जवळ असलेल्या ओमेगा हॉटेलच्या शेजारी डोंगरातील माती महामार्गावर यायला सुरुवात झाली आहे. डोंगराच्या वरच्या बाजूला मोठे दगड आहेत. त्यामुळे मुंबईकडून गोव्याकडे जाणारी वाहतूक कोणत्याही क्षणी बंद होण्याची शक्यता आहे. याशिवाय, रायगड जिल्ह्यात खोपोली-पेण महामार्ग पाण्याखाली गेला आहे. सारसन ते इसांबा फाट्यावर पाणी आल्याने प्रचंड वाहतूक कोंडी आहे. हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पाताळगंगा आणि भोगावती नदीने धोका पातळीच्या वर वाहत आहे. सध्या मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी असून अनेक गाड्या गेल्या 10 ते 12 तासांपासून अडकून पडल्या आहेत. (Maharashtra Heavy Rain news)
मुंबई गोवा महामार्गावर चिपळूणच्या खवटीजवळ हॉटेल अनुसयाच्या दरम्यान भलीमोठी दरड महामार्गावर कोसळल्याने दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली आहे. पहाटेपासून दरड हटवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मुसळधार पाऊस आणि अंधारामुळे दरड हटवण्याच्या कामात व्यत्यय.प्रशासनाकडून दरड हटवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनाच्या रांगा लागल्या आहेत.
Maharashtra Rain: पावसामुळे कोणकोणते रस्ते बंद आहेत?
मुंबई - पुणे एक्स्प्रेसवे बंद
मुंबई - पुणे जुना हायवे बंद
मुंबई - गोवा हायवे चिपळूण खवटीजवळ बंद
रायगडमध्ये पेण-खोपोली मार्ग बंद
रायगडमध्ये मुंबई-गोवा महामार्ग सुकेळी खिंडीत बंद
रायगड - माणगाव-पाली मार्ग बंद
रायगड - माणगाव-पुणे ताम्हणी घाटमार्ग बंद
Mumbai Pune Missing Link: मिसिंग लिंकवर दरड कोसळली
मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर नव्याने बांधण्यात आलेल्या मिसिंग लिंकवर मोठी दुर्घटना घडली आहे. मिसिंग लिंकचा स्लॅब कोसळून त्यामधून पाण्याचा लोंढा आणि माती आत शिरली. हा भयानक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लोणावळा परिसरात सोमवारी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. या पावसामुळे मुंबई पुणे घाटातील रेल्वे मार्गावर दरड कोसळून वाहतूक ठप्प झाली आहे. प्रशासनाने नव्या आणि जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरुन प्रवास टाळावा, असे आवाहन नागरिकांना केले आहे.
Mahad Rain news: सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली
रायगड जिल्ह्याला आज आणि उद्या दोन दिवस रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. त्यामुळे रायगड जिल्ह्यात कालपासून मुसळधार पावसाची बॅटिंग सुरूच आहे.. मुसळधार पावसाचा फटका दक्षिण रायगड मधील महाड शहराला बसलाय. कारण महाड शहराच्या बाजूने वाहणारी सावित्री नदीने धोका पातळी ओलांडून रौद्ररूप धारण केल आहे. सावित्री नदीच्या पुराच्या पाण्याचा विळखा महाड शहरासह आजूबाजूच्या शेतीला बसला असून महाड शहरातील अनेक बाजारपेठ परिसरात पुराचे पाणी शिरले आहे.
Satara news: साताऱ्यात ताथवडे घाटात डोंगरावरील दगड गाडीवर कोसळून झालेल्या अपघातात चालकाचा मृत्यू
सातारा जिल्ह्याच्या फलटण तालुक्यातही पावसामुळे घाटांमध्ये धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. देवदर्शनासाठी आलेल्या चारचाकीवर फलटण तालुक्यातील फलटण–पुसेगाव मार्गावरील ताथवडे घाटात कारवर दगड कोसळल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. योगेश पोपट जगताप (रा. आंबे खुर्द, बारामती) असे मृत्यू झालेल्या चालकाचे नाव आहे. या भागात पडत असलेल्या
मुसळधार पावसामुळे ताथवडे घाटात डोंगरावर सैल झालेला दगड वाहनाच्या काचेवर कोसळला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन दिशादर्शक फलकावर आदळले. याची नोंद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
आणखी वाचा
Before You Go
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी





















