Mumbai : जी 20 परिषदेच्या बैठकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई चकाचक! मायानगरीचं रुपडं बदलणार
वर्षभरात संपूर्ण मुंबई बदलून टाकू, मात्र मुंबईकरांचं सहकार्य आवश्यक आहे, असं आयुक्त इक्बाल सिंह चहल (iqbal singh chahal)यांनी म्हटलं आहे.
Mumbai G20 Meeting Update: यंदा आपल्या देशाला जी 20 (G 20) परिषदेचं यजमानपद मिळालं आहे. या पार्श्वभूमीवर तयारीला वेग आला आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत जी 20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी सुरु आहे. वर्षभरात संपूर्ण मुंबई बदलून टाकू, मात्र मुंबईकरांचं सहकार्य आवश्यक आहे, असं आयुक्त इक्बाल सिंह चहल (iqbal singh chahal)यांनी म्हटलं आहे. 'स्वच्छ मुंबई सुंदर मुंबई' करून संपूर्ण मुंबई बदलण्याचं काम बीएमसीकडून हाती घेण्यात आलं आहे. मात्र मुंबईचं रुपडे पालटण्यासाठी प्रशासनाला नागरिकांनी सहकार्य करणे आणि जबाबदारी घेण्याचं मुंबई महापालिका आयुक्तांनी आवाहन केलं आहे.
मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी जुलै ऑगस्टमध्ये आम्हाला सूचना दिल्या होत्या. मुंबईचा सुशोभीकरण आणि सौंदर्यीकरण करायचा आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी गेटवे ऑफ इंडियाला 180 आणि नंतर अंधेरीत 310 सौंदर्यकरणाच्या प्रकल्पाचा उद्घाटन केलं. फक्त ठराविक भागच नाही तर पूर्ण मुंबई स्वच्छ आणि सुंदर करण्याचा आमचा पूर्णपणे प्रयत्न असणार आहे आणि हे आम्ही करून दाखवणार आहोत, असं आयुक्तांनी म्हटलं आहे.
देशाचे प्रतिनिधी जी 20 परिषदेच्या बैठकीला मुंबईत येणार
विकसित आणि विकसनशील देशाचे प्रतिनिधी अधिकारी जी 20 परिषदेच्या बैठकीला मुंबईत येणार आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईचं रुपडं बदललं जाणार आहे. आपली तयारी सजावट ही एक छाप पाडून गेली पाहिजे, यासाठी आम्ही मागच्या दहा-बारा दिवसात हे काम पूर्ण करतोय आणि कुठली कसर आम्ही यामध्ये सोडणार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.
पाहुण्यांचं आदरातिथ्य करणे हे एक आपल्यासाठी प्रतिष्ठेचा विषय आहे आणि त्यात आपण कुठेही कमी पडणार नाही. ज्या भागांमध्ये या देशाचे प्रतिनिधी जात आहेत त्या भागांना आम्ही शोकेस केलेला आहे. सजावट केलेली आहे . त्यासोबतच आपल्या मुंबईची राज्याची संस्कृती, लोककला सुद्धा यामध्ये दाखवली जाणार आहे. जी 20 परिषेदेसाठी जे सौंदर्यीकरण केलेले आहे ते सौंदर्य असंच टिकून राहू देण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे ही विनंती आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.
500 सौंदर्यीकरणाचे प्रकल्प हाती घेतले आहे. त्यांचे भूमिपूजन झालं आहे त्यातील निम्मे तीन महिन्यात पूर्ण करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. आणखी बाराशे प्रकल्प आम्ही सुरू करत आहोत म्हणजे एकूण 1700 प्रकल्पाचे काम वर्षभरात पूर्ण करणार आहोत, असं चहल यांनी सांगितलं. त्यामुळे पूर्ण मुंबई अशी स्वच्छ आणि सुंदर दिसेल मात्र लोकांनी सहकार्य करणे गरजेचे आहे, असंही चहल म्हणाले.
ही बातमी देखील वाचा