BMC : मुंबईच्या माजी महापौर पालिका आयुक्तांवर नाराज; पत्र लिहून केली 'ही' मागणी
BMC News : मुंबई महापालिका प्रशासक असलेल्या पालिका आयुक्तांवर माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
Kishori Pednekar : मुंबई माजी महापौर किशोरी पेडणेकर मुंबई महापालिका आयुक्तांवर नाराज आहे. किशोरी पेडणेकर यांनी पालिका आयुक्तांना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली आहे. मुंबई महापालिका प्रशासनाकडून नगरसेवकांकडून घेण्यात आलेले निर्णय बदलण्यात येत असल्याचा आरोप किशोरी पेडणेकर यांनी केला आहे.
मुंबई महापालिकेची मुदत संपल्याने सध्या महापालिकेवर सध्या प्रशासकीय राजवट सुरू आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल हे सध्या प्रशासक म्हणून काम करत आहेत. मुंबई महापालिकेच्या कार्यकाळात अनेक निर्णय घेण्यात आले होते. मुंबई महापालिकेची मुदत संपण्याआधी घेतलेल्या निर्णयात प्रशासनाचा हस्तक्षेप सुरू असल्याची चर्चा आहे. पालिका सभागृह आणि स्थायी समितीने घेतलेल्या निर्णयात प्रशासन बदल करत आहेत. हा बदल म्हणजे सभागृहाचा अवमान असल्याचे माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले. विरोधकांच्या दबावाला बळी पडू नका असे आवाहनही त्यांनी पालिका प्रशासनाला केले आहे. .
किशोरी पेडणेकर यांनी महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले की, महानगरपालिकेच्या कार्यकाळात महानगरपालिका तसेच स्थायी समितीसह विविध समित्यांनी घेतलेल्या निर्णयामध्ये फेरफार करण्याबाबतचे प्रस्ताव संबंधित खात्यांकडून प्रशासकाच्या मंजुरीसाठी सादर करण्यात येत असल्याची माहिती आहे. मात्र, महानगरपालिका तसेच स्थायी समितीसह विविध समित्यांनी महानगरपालिकेच्या कार्यकाळात घेतलेल्या निर्णयांमध्ये कोणताही फेरफार अथवा सदर प्रस्ताव रद्द करण्याबाबतचे निर्णय महानगरपालिका अस्तित्वात येईपर्यंत प्रशासकांनी घेणे योग्य ठरणार नसल्याचे किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.
मुंबई महापालिकेची मुदत संपुष्टात येण्याआधी पालिकेच्या स्थायी समितीने, सभागृहाने बहुमताने घेतलेल्या निर्णयांवर काँग्रेस, भाजपने नाराजी व्यक्त केली होती. भाजपने काही प्रस्ताव रद्द करण्याची मागणीदेखील केली होती. त्याशिवाय काही प्रस्तावांवर विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर काही प्रस्तावांत बदल होत असल्याची चर्चा सुरू आहे. आता, त्यातच माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबई महापालिका आयुक्त आणि प्रशासक असलेले इक्बाल चहल यांना पत्र लिहिले आहे.