Mumbai BJYM Protest : राममंदिराच्या मुद्द्यावरुन भाजप-शिवसेना कार्यकर्ते भिडले, शिवसेना भवनाजवळ गोंधळ
शिवसेनेकडून राम मंदिर संदर्भात भाजपवर करण्यात आलेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी भाजपा युवा मोर्चाकडून आज शिवसेना भवन येथे विरोध प्रदर्शन करण्यात आलं. याला प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेनेचे कार्यकर्तेही तिथं जमले. यावेळी भाजप आणि शिवसेना कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचे चित्र दिसून आले.
![Mumbai BJYM Protest : राममंदिराच्या मुद्द्यावरुन भाजप-शिवसेना कार्यकर्ते भिडले, शिवसेना भवनाजवळ गोंधळ Mumbai Dadar News : Bharatiya Janata Yuva Morcha workers protested outside Shiv Sena Bhavan regarding Ayodhya Ram Temple construction land Scam Mumbai BJYM Protest : राममंदिराच्या मुद्द्यावरुन भाजप-शिवसेना कार्यकर्ते भिडले, शिवसेना भवनाजवळ गोंधळ](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/16/8ca93fb53dac296122de846fc35a6742_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई :शिवसेनेकडून राम मंदिर संदर्भात भाजपवर करण्यात आलेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी भाजपा युवा मोर्चाकडून आज शिवसेना भवन येथे विरोध प्रदर्शन करण्यात आलं. याला प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेनेचे कार्यकर्तेही तिथं जमले. यावेळी भाजप आणि शिवसेना कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचे चित्र दिसून आले. यावेळी गोंधळ उडाल्याने पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.
अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी भूसंपादनाबाबत खोटे आणि बनावट आरोप करून शिवसेनेने हिंदू धार्मिक स्थळ आणि हिंदूंच्या श्रद्धा आणि आस्था यांचा अपमान केला असल्याचं म्हणत भारतीय जनता युवा मोर्चा मुंबईतर्फे शिवसेनेविरोधात "फटकार मोर्चा" आयोजित करण्यात आला. यावेळी भाजयुमो आणि शिवसेना कार्यकर्ते एकमेकांसमोर आल्यानं गोंधळ उडाला. बाबरी मज्जिद जेव्हा पाडण्यात आली तेव्हा शिवसेनेने गर्वाने पुढे आली आणि आता भाजप फक्त विनाकारण याचा राजकारण करत आहे, असं यावेळी आमदार सदा सरवणकर आणि माजी महापौर श्रद्धा जाधव यांनी म्हटलं आहे. कुणीही महिलांवर हल्ला केलेला नाही. पोलिस तिथं उपस्थित होते, असं श्रद्धा जाधव म्हणाल्या.
भाजपनं का केलं आंदोलन, काय म्हणताहेत भाजप नेते
अयोध्येत शिवसेनेने राम मंदिर बांधण्यासाठी भूसंपादनाबाबत खोटे आणि बनावट आरोप केल्याबद्दल भारतीय जनता युवा मोर्चाने शिवसेना भवनावर मोर्चा काढला. मुंबईचे अध्यक्ष तेजिंदरसिंग तिवाना म्हणाले की, सत्तेत राहण्यासाठी आणि खुर्ची कायम ठेवण्यासाठी शिवसेना सोनिया सेना बनून कॉंग्रेसच्या ईशार्यावर पूर्णपणे नाचत आहे. सत्तेच्या लोभाने शिवसेनेला अशा प्रकारे अंधत्व आले आहे की आता ते हिंदु धर्म, आस्था असलेल्या भगवान श्री राम मंदिरात हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीविरूद्ध राजकीय षडयंत्र रचत आहेत. हिंदू व आमचे श्रद्धेवर हा हल्ला आहे. हा मोर्चा आपल्या तरूणाईच्या बाजूने आहे. धर्मातून परके झालेली शिवसेनेला फटकार आहे, आपल्या क्षुल्लक राजकारणासाठी आमच्या धर्मावर आणि आस्थेवरील आक्रमण थांबवा, असं तिवाना म्हणाले. तर या प्रकरणाची पूर्ण चौकशी करावी, चौकशीनंतर सत्य बाहेर येईल असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.उद्धव ठाकरेंनी जबाबदारी विसरु नये. पोलिसांनी योग्य चौकशी करुन कारवाई करावी, असं दरेकर म्हणाले. उद्धव ठाकरे यांचे सरकार हे गुंडाचे सरकार आहे अशी टीका भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे.
शिवसेनेचं म्हणणं काय?
बाबरी मज्जिद जेव्हा पाडण्यात आली तेव्हा शिवसेनेने गर्वाने पुढे आली आणि आता भाजप फक्त विनाकारण याचा राजकारण करत आहे, असं यावेळी आमदार सदा सरवणकर यांनी म्हटलं आहे. जर शिवसेना भवनावर कुणी दगड धोंडे घेऊन येत असेल तर आम्ही शिवसैनिक स्वस्थ बसणार नाही, असंही सरवणकर म्हणाले. त्यांनी म्हटलं की, शिवसेना भवनावर हल्ला करण्याचा भाजपचा प्लान होता. भाजप शिवसेनेची युती होती, हे भाजप विसरलं आहे, असंही ते म्हणाले. शिवसेना भवनासमोर आंदोलन करणं चुकीचं आहे. पक्षावर दबाव आणण्याचं काम केलं जात आहे. सेना भवनावर दगड धोंडे घेऊन येत असताना आम्ही गप्प बसणार नाही. सेना भवनाकडे कुणी वाकड्या नजरेनं पाहू नये. शांतपणे आंदोलन केलं असतं तर आम्ही कुठलाही आक्षेप घेतला नसता. हे भाजपनं जाणूनबुजून केलं आहे, असं सरवणकर म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)