Cruise Drugs Case : समीर वानखेंडेंच्या अडचणी वाढल्या, चुकीच्या पद्धतीने तपास केल्याबद्दल केंद्र सरकार करणार कडक कारवाई
Action Against Sameer Wankhede: क्रूझ ड्रग्ज केस प्रकरणी चुकीच्या पद्धतीने तपास केल्याबद्दल एनसीबीचे तत्कालीन मुंबई झोनल अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात कारवाई होण्याची शक्यता आहे.
मुंबई: मुंबई कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणाचा निकाल लागला असला तरी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा तपास त्यांनी चुकीच्या पद्धतीने केला असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने त्यांच्याविरोधात कडक कारवाई करण्याची शक्यता आहे. सरकारने वरिष्ठ अधिकाऱ्यांना वानखेडे यांच्याविरोधात कारवाई करण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
समीर वानखेडे यांच्यावर बनावट जात प्रमाणपत्रक जमा केल्याप्रकरणी या आगोदरच एक गुन्हा नोंद आहे, त्या प्रकरणी कारवाई सुरू आहे. त्यात आता आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात क्लीन चिट देण्यात आलं आहे. आर्यन खानला या प्रकरणात तुरुंगात जावं लागलं होतं. आता त्याला क्लीन चिट देण्यात आल्याने या प्रकरणाचा तपास चुकीच्या पद्धतीने झाल्याचं स्पष्ट झालं आहे. या प्रकरणात वानखेडे यांच्या टीमकडून चुकी झाल्याचं समोर आलं आहे. आर्यन खानला अटक करण्यात आलं त्यावेळी या प्रकरणाचा संपूर्ण तपास हा समीर वानखेडे करत होते.
या प्रकरणात एनसीबीच्या व्हिजिलन्स टीमचा रिपोर्ट लवकरच समोर येण्याची शक्यता आहे. या रिपोर्टनंतर समीर वानखेडे यांच्यासमोरील अडचणींमध्ये अधिक वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वानखेडे यांनी ज्या पद्धतीने या प्रकरणाचा तपास केला, त्यामध्ये अनेक चुका असल्याचं निदर्शनाला आल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे.
आर्यन खानला क्लीनचिट
कॉर्डिलिया क्रझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी आर्यन खानसह सहा जणांना क्लीनचिट मिळाली आहे. सबळ पुराव्यांअभावी या सहा जणांना निर्दोष सोडण्यात आलं आहे. या प्रकरणी आता केवळ 14 जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. एनसीबीचे डीडीजी संजय सिंह यांनी याबाबत माहिती दिली आहे.
काय आहे प्रकरण?
मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कॉर्डिलिया क्रूझवर 3 ऑक्टोबर 2021 रोजी एनसीबीकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्स जप्त करण्यात आले होते. त्यात सुपरस्टार शाहरुख खानचा मोठा मुलगा आर्यन खानसह त्याचा बालमित्र अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांच्यासह अन्य 20 जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आर्यनला बरेच दिवस तुरुंगात राहावं लागलं होतं. हे प्रकरण देशभरात गाजलं होतं.